सोलापूर : लक्ष्मीनगर (अनगर) येथील लोकनेते साखर कारखान्याने एक महिन्यात दोन लाख मे. टन उसाचे गाळप केले असून, यावर्षी प्रायोगिक तत्त्वावर प्रथमच ऊसतोडणी यंत्राद्वारे ऊस तोडला जात आहे. यंत्राच्या माध्यमातून दररोज २ हजार मे. टन ऊस गाळपासाठी येत असून, ऊस तोडणी यंत्र म्हणजे शेतकऱ्यांना वरदान असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी दिली.
साखर कारखाना सुरू होऊन एक महिन्याचा कालावधी लोटला आहे. लोकनेते साखर कारखान्याचे अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी मांजरा सहकारी साखर कारखान्याला भेट देऊन तेथील ऊस तोडणी कार्यक्रमाची माहिती घेतली. तो कारखाना शंभर टक्के ऊसतोडणी यंत्राने ऊस तोड करीत आहे. अध्यक्ष पाटील यांनी त्याच पार्श्वभूमीवर चालू गाळप हंगामासाठी २५ ऊसतोडणी यंत्रासाठी शेतकऱ्यांना कारखान्याच्या वतीने कर्जपुरवठा केला आहे.
सध्या कार्यक्षेत्रात २२ ऊस तोडणी यंत्राद्वारे ऊस तोडणी सुरू आहे. ऊस लवकर गाळपास येत आहे. दररोज ३० टक्के म्हणजे सरासरी २ हजार मे.टन ऊस गाळपासाठी येत आहे. पुढील वर्षी १०० टक्के ऊस हा यंत्राद्वारे तोडण्याचा प्रयत्न आहे. ऊसतोडणी यंत्रामुळे शेतकऱ्यांना अडचणीच्या ठरणाऱ्या ऊस तोडणी टोळ्या कमी होणार आहेत. ऊसतोडणी यंत्रामुळे पाचट कुट्टी होत असून, त्याचे खत तयार होते. तसेच जमीन ओल धरून राहते. त्यामुळे पाण्याची बचत होते. तसेच ऊसही खरडून तुटला जातो असे ही अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी सांगितले.


















