सोलापूर : पंढरपुरमध्ये ऊस दर आंदोलन तापले, शेतकऱ्यांनी गुरुवारी वाखरीत पालखी मार्ग रोखला

सोलापूर : उसाला प्रतिटन ३५०० रुपये दर मिळावा यांसह विविध मागण्यांसाठी शेतकरी नेते समाधान फाटे हे सहकाऱ्यांसमवेत उपोषणाला बसले आहेत. उपोषणाच्या चौथ्या दिवशी उपोषणकर्त्यांची तब्येत ढासळू लागली आहे. त्यामुळे ऊस दर संघर्ष समितीने गुरुवारी सकाळी पंढरपूर-फलटण हा प्रमुख पालखी मार्ग अडवून रास्ता रोको आंदोलन केले. मागण्या मान्य न झाल्यास कारखाने बंद पाहू, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे. वाखरी येथे पंढरपूर- फलटण रस्त्यावर सकाळी ९ ते १२ वाजेपर्यंत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. वाखरीतील आंदोलनानंतर सीताराम शुगरच्या गव्हाणीत शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उड्या टाकून कारखान्याचे गाळप बंद पाडले. संघटनेच्या या आक्रमक पवित्र्यानंतर सीताराम प्रशासनाने पहिली उचल ३ हजार जाहीर केली आहे.

दरम्यान, चौथ्या दिवशी चार कार्यकर्त्यांचे उपोषण आंदोलन सुरूच असून त्यांची प्रकृती आणखी खालावली आहे. बुधवारी रात्रीपासून कार्डियाक रुग्णवाहिका आणि डॉक्टरांचे पथक आंदोलनस्थळी हजर ठेवले आहे. गुरुवारी दिवसभरात हजारो शेतकऱ्यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलकांना पाठिंबा जाहीर केलेला आहे. शेतकऱ्यांना कुठल्याही वजनकाट्यावर वजन करून आणण्याची घोषणा सर्व कारखान्यांनी करावी, गाईच्या दुधाला ५० रुपये व म्हशीच्या दुधाला ८० रुपये प्रतिलिटर दर मिळावा. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमुक्ती झाली पाहिजे. दोन साखर कारखान्यांमधील २५ किलोमीटरची हवाई अट रद्द करा आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. आमदार अभिजित पाटील यांनी सध्या सुरू असलेल्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित केला आहे. तर शेतकरी संघटनांनी शुक्रवारी विठ्ठल सहकारी आणि पांडुरंग सहकारी या दोन्ही साखर कारखान्यांचे गाळप बंद पाडण्याचा इशारा दिला आहे. रास्ता रोको आंदोलनात भगीरथ भालके, शेतकरी नेते नितीन बागल, सचिन पाटील, माऊली जवळेकर, रणजित बागल, संग्राम गायकवाड, निवास नागणे आदी सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here