सोलापूर : उसाला पहिली उचल साडेतीन हजार रुपये मिळावी, या मागणीसाठी पंढरपूर तालुक्यात सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. वाखरी (ता. पंढरपूर) येथील पालखी तळावर मागील पाच दिवसांपासून बेमुदत उपोषण सुरू आहे. उपोषणकर्ते समाधान फाटे, बाळासाहेब जगदाळे यांच्यासह इतर दोघांची प्रकृती ढासळल्यानंतर त्यांच्यावर गुरुवारी रात्रीपासून उपचार सुरू आहेत. मागील दोन दिवसांपासून ऊस दर संघर्ष समितीने आंदोलन अधिक तीव्र केले.शुक्रवारी (ता. १२) पहाटे हिंसक वळण लागले. ऊस दर मागणीसाठी आक्रमक झालेल्या शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याकडे ऊस घेऊन जाणाऱ्या चार ट्रॅक्टरचे ३२ टायर फोडले. त्यामुळे तालुक्यातील ऊस वाहतूक मंदावली आहे.
संघर्ष समितीच्यावतीने श्रीपूर येथील पांडुरंग सहकारी साखर कारखान्यावर ऊसदर मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. आंदोलना दरम्यान कार्यकर्त्यांनी गव्हाणीत उड्या मारून कारखाना बंद पाडला. या कारखान्यावरील आंदोलनाचे तालुक्यातील इतर कारखाना परिसरात पडसाद उमटले. गुरसाळे येथील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला पोलिसांनी संरक्षण दिले आहे. मेन गेटवर आज सकाळपासून पोलिसांचा पहारा आहे. शुक्रवारी पहाटे वाखरी येथील बाजीराव विहीर परिसरातून विठ्ठल सहकारी साखर कारखान्याकडे ऊस घेऊन जाणाऱ्या चार ट्रॅक्टर ट्रॅलींचे ३२ टायर फोडण्यात आले. वाखरी येथील आंदोलनाबद्दल भगीरथ भालके यांच्यासह १८ कार्यकर्त्यांवर पंढरपूर ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. संग्राम गायकवाड, रणजित बागल, तानाजी बागल, सचिन पाटील आदींवर बेकायदेशीर जमाव जमवून रास्ता रोको आंदोलन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
















