सोलापूर : यंदा सोलापूर जिल्ह्यातील ३५ कारखान्यांनी गाळप हंगाम सुरु केला आहे. मात्र एक-दोन साखर कारखाने वगळता इतरांनी अद्याप ऊस दर जाहीर केलेला नाही. ऊस गाळप हंगाम सुरू होऊन एक महिना उलटला तरी येथील दराचा प्रश्न सुटलेला नाही. यावरुन शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. कारखान्यांनी दोन दिवसांत ऊस दर जाहीर करावा अन्यथा कारखाने बंद पाडू, अशा इशारा त्यांनी शुक्रवारी दिला. येथील एक-दोन कारखान्यांनी दर जाहीर केले आहेत. तोही एफआरपीपेक्षा कमी आहे. त्यात येथील कारखाने काटामारी आणि उतारा चोरी करत असल्याचा आरोप ‘स्वाभिमानी’ने केला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी कारखान्यांना ऊस दर जाहीर करण्यासाठी ३० नोव्हेंबरची मुदत दिली होती. पण ही मुदत संपली तरी काही कारखाने वगळता बहुतांश कारखांन्यांनी दर जाहीर केलेले नाहीत. याबाबत शेट्टी यांनी संताप व्यक्त केला. ते म्हणाले की, जवळपास एक महिना होऊन गेला. सोलापूर जिल्ह्यातील कारखाने अजूनही तोंड उघडायला तयार नाहीत. जिल्ह्याधिकाऱ्यांच्या आवाहनानुसार, आम्ही ३० तारखेपर्यंत वाट बघितली. पण कारखाने काहीच बोलायला तयार नाहीत. म्हणून दोन दिवस आम्ही वाट बघू, अन्यथा एक एक कारखान्यांची गव्हाणी बंद पाडल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. कोल्हापुरातील कारखान्यांनी यंदाच्या हंगामात प्रतिटन ३,६०० रुपयांपर्यंत दर जाहीर केले आहेत. येथे गाळप हंगाम वेगाने सुरु आहे. आता येथील ऊस दरासाठी स्वाभिमानी आक्रमक झाली आहे.


















