सोलापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे थकीत ऊस बिलासाठी आजपासून आंदोलन

सोलापूर : ऊस गळीत हंगाम २०२४-२५ संपून सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटला आहे. या कालावधीत शेतकऱ्यांनी साखर कारखान्यांवर हेलपाटे मारून सोलापूर जिल्ह्यातील अनेक कारखान्यांनी थकीत ऊसबिले दिलेली नाहीत. जून महिना संपला तरीही शेतकऱ्यांना ऊस बिले मिळालेली नाहीत. शेतकरी सध्या पेरणीचा हंगाम सुरु असताना आर्थिक अडचणींचा सामना करत आहे. त्यामुळे थकीत ऊसबिलांप्रश्नी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने आज, १ जुलैपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन केले जाणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पूनम गेट येथे हे बेमुदत धरणे आंदोलन सुरू होणार आहे.

याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सांगितले की, थकीत ऊस बिलासाठी संघटनेने वेळोवेळी आंदोलने केल्यानंतर साखर आयुक्तांनी गोकुळ शुगर, जयहिंद शुगर, मातोश्री शुगर, सिद्धेश्वर सहकारी, भीमा सहकारी, सहकार शिरोमणी, इंदरेश्वर शुगर या जिल्ह्यातील साखर कारखान्यांवर आरआरसी कारवाईचे आदेश सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांना मार्च, एप्रिल महिन्यात दिले. जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशाची अंमलबजावणी करून ऊस बिले जमा करायला लावायला हवी होती. तथापि, काहीच झालेले नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी साखर आयुक्तांच्या आरआरसी आदेशाची अंमलबजावणी करून शेतकऱ्यांची थकीत ऊसबिले तत्काळ जमा करावीत, या मागणीसाठी हे आंदोलन केले जात आहे. संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे, मोहसीन पटेल यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here