सोलापूर : सदाशिवनगर (ता. माळशिरस) येथील श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या चालू गळीत हंगाम २०२५-२६ मध्ये कारखान्यात उत्पादित झालेल्या १ लाख १११ व्या साखर पोत्याचे पूजन माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते झाले. श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या वतीने यंदाच्या गळीत हंगामासाठी येणाऱ्या उसाला ३०२५ रुपये प्रतिटन दर जाहीर करण्यात आला आहे.
कारखान्याच्या सर्वांगीण विकासासाठी, शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि सदैव प्रगतिशील वाटचालीसाठी आम्ही कटिबद्ध आहोत. सहकार, गुणवत्ता आणि पारदर्शकतेच्या बळावर हे शक्य झाले आहे अशी भावना कारखान्याचे अध्यक्ष आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी व्यक्त केली. यावेळी सत्यप्रभादेवी मोहिते-पाटील, उपाध्यक्ष ॲड. मिलिंद कुलकर्णी, अर्जुनसिंह मोहिते-पाटील, विश्वतेजसिंह मोहिते-पाटील, संचालक सुरेश पाटील, महादेव शिंदे, सुनील माने यांच्यासह कारखान्यातील अधिकारी आणि कर्मचारी व शेतकरी सभासद उपस्थित होते.

















