सोलापूर : जिल्ह्यातील तीन महत्त्वाच्या सहकारी संस्थांकडे थकलेल्या कर्जाची वसुली करण्यासाठी दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने हाती घेतलेली लिलाव प्रक्रिया या महिन्याच्या अखेरीस पूर्ण होत आहे. यापैकी स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्याकडे १३ कोटी २० लाख रुपयांची येणे बाकी असून, या कारखान्याच्या तारण मालमत्ता लिलावासाठी सहा कोटी नऊ लाख रुपयांची बयाणा रक्कम ठेवण्यात आली आहे. शारदा सूतगिरणीकडे ३० कोटी ४४ लाख रुपयांची येणे बाकी असून या सूतगिरणीच्या तारण मालमत्तेच्या लिलावासाठी एक कोटी ४७ लाख रुपयांची बयाणा रक्कम ठेवण्यात आली आहे. शरद शेतकरी सहकारी सूतगिरणीकडे १५ कोटी ८१ लाख रुपयांची येणे बाकी असून, तारण मालमत्तेच्या लिलावासाठी दोन कोटी ८० लाख रुपयांची बयाणा रक्कम ठेवण्यात आली आहे.
दहिटणेतील स्वामी समर्थ सहकारी साखर कारखाना, कुंभारी येथील शारदा यंत्रमाग विणकर सहकारी सूतगिरणी व नान्नज येथील शरद शेतकरी सहकारी सूतगिरणी यांच्या तारण मालमत्तेची लिलाव प्रक्रिया सुरू आहे. या तिन्ही संस्थांकडे ऑक्टोबरअखेर येणे बाकी असलेल्या रकमेवर ही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सेक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल अॅसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट (सरफेसी) अॅक्ट २००२ नुसार लिलाव प्रक्रिया राबविली जात आहे. बीड मीटिंग ८ डिसेंबर रोजी होणार आहे. निविदा दाखल करण्याची अंतिम तारीख १५ डिसेंबर रोजी देण्यात आली आहे. टेक्निकल बीड १९ डिसेंबरला तर फायनान्शिअल बीड ३० डिसेंबर रोजी होणार आहे.


















