सोलापूर : जिल्ह्यात गाळप हंगाम अंतिम टप्प्यात, तब्बल ५०० कोटींची ऊस बिले थकीत

सोलापूर : जिल्ह्यात यंदा ३४ साखर कारखान्यांनी गळीत हंगामात सहभाग घेतला आहे. या कारखान्यांनी आतापर्यंत एकूण १ कोटी ५३ लाख ७६ हजार ३३१ मे. टन उसाचे गाळप केले आहे. त्यापासून १ कोटी ३५ लाख १८ हजार ३५ क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. आतापर्यंत दहापेक्षा जास्त कारखान्यांचा हंगाम बंद झाला आहे. उर्वरित कारखानेही लवकरच बंद होतील. मात्र कारखानदारांकडे शेतकऱ्यांची तब्बल ५०० कोटी रुपयांची ऊस बिले थकीत असल्याचे सांगण्यात येते.

जिल्ह्यातील बहुतांश कारखानदार सत्ताधारी पक्षाशी संबंधित असल्याने त्यांच्या राजकीय दबावापुढे प्रशासनही हतबल असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे. नियमानुसार ऊस तोडणीपासून १४ दिवसांच्या आत शेतकऱ्याला उसाची रक्कम देणे बंधनकारक आहे. रक्कम थकल्यास थकीत रकमेवर व्याज देण्याची ही तरतूद आहे. मात्र जिल्ह्यात साखर कारखानदारांनी मजबूत साखळी तयार केली आहे. अपवाद वगळता कारखानदार सुरुवातीला उसाची बिले वेळेवर देतात. हंगाम मध्यावर येतात शेतकऱ्यांच्या उसाची रक्कम थकविण्यास सुरुवात होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here