सोलापूर: श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याने कारखान्याने आजअखेर तीन लाख मे. टन गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करून ३,००,५६४ क्विंटल साखर उत्पादन केले आहे. कारखान्याने गेली तीन वर्षे स्पर्धेत राहून एफआरपीपेक्षा जास्त ऊस दर, कामगारांचे पगार दरमहा दिले आहेत. सभासद, ऊसतोडणी वाहतूक ठेकेदार व कर्मचारी यांचे सहकार्याने डिसेंबर २०२५ अखेर २८५० रुपये प्रतिटनप्रमाणे ऊस बिल दिले आहे. तसेच तोडणी वाहतूक बिलेही १५ जानेवारी २०२६ अखेर अदा केली आहे. इतर कारखान्यांच्या स्पर्धेत टिकण्यासाठी यापुढील काळात कमी दिवसात जास्त गाळप करावे लागणार आहे, असे मत कारखान्याचे अध्यक्ष शिवानंद पाटील यांनी व्यक्त केले. श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या चालू हंगामाच्या सांगता समारंभ ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संचालक राजेंद्र पाटील होते.
यावेळी संचालक महादेव लुगडे व त्यांच्या पत्नी यांच्या हस्ते सत्यनारायण महापूजा झाली. यावेळी हंगामात ऊसतोडणी व जास्तीत जास्त ऊस वाहतूक केलेले पहिले तीन ठेकेदार भिवा शिंदे, सुनील जाधव, प्रशांत ठेंगील, वसंत दोलतडे, राजकुमार आसबे, तात्यासाहेब घोडके तसेच बैलगाडी तोडणी वाहतूक ठेकेदार भाऊसाहेब पठाडे, रमेश पठाडे, अजिनाथ पन्हाळकर, मशिनने तोडणी वाहतूक ठेकेदार सुनील लुगडे, शिवाजी आवताडे, महादेव लोखंडे यांचा सत्कार करण्यात आला. उपाध्यक्ष तानाजी खरात, संचालक मुरलीधर दत्तू, गौरीशंकर बुरकूल, गोपाळ भगरे, भारत बेदरे, दयानंद सोनगे, औदुंबर वाडदेकर यांच्यासह कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी, ऊस तोडणी वाहतूक ठेकेदार उपस्थित होते.


















