सोलापूर : पिंपळनेर (ता. माढा) येथील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक लवकरच होणार आहे. सुमारे २३ हजार सभासद संख्या असलेल्या, माजी आमदार बबनराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या या कारखान्याची निवडणूक घेण्यात यावी, असे आदेश केंद्राच्या सहकार विभागाच्या निवडणूक प्राधिकरणाच्या अध्यक्षांनी दिले आहेत. केंद्रीय सहकार खात्याचे निवडणूक प्राधिकरणाचे अध्यक्ष देवेंद्र कुमार सिंह यांनी जिल्हाधिकाऱ्यांना या निवडणुकीसाठी प्राधिकृत अधिकारी म्हणून घोषित केले आहे. त्यांनी दिलेल्या आदेशानुसार, जिल्हाधिकारी यांना निवडणूक निर्णय अधिकारी नेमणूक करण्याचे अधिकार दिले आहेत.
माजी आमदार बबनराव शिंदे यांनी २००३ साली ही संस्था उभी केली आहे. सध्या या संस्थेची पिंपळनेर व करकंब अशा दोन युनिट कार्यान्वित आहेत. गेल्या काही वर्षांपूर्वी ही संस्था बहुराज्य संस्था म्हणून नोंदणी करण्यात आली आहे. यामुळे या संस्थेच्या कामकाजावर राज्य सहकार खात्याचे नियंत्रण संपुष्टात येऊन केंद्रीय सहकार खात्याचे नियंत्रण आले आहे. या संस्थेची निवडणूक घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाले असून, महिनाअखेरीस निवडणूक प्रक्रियेस सुरवात होण्याची शक्यता आहे. त्यावेळी यासंदर्भातील अधिसूचना घोषित होईल व फेब्रुवारी महिन्यात पुढील प्रक्रिया होण्याची शक्यता आहे.
















