सोलापूर : श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याने चालू गळीत हंगामात १६ ते ३१ डिसेंबर या पंधरवड्यात ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांना प्रति मेट्रिक टन २८५० रुपयांप्रमाणे पहिला हप्ता त्यांच्या मागणीनुसार संबंधित बँका व पतसंस्थांमध्ये वर्ग करण्यात आला असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष शिवानंद पाटील यांनी दिली. याप्रसंगी उपाध्यक्ष तानाजी खरात यांच्यासह संचालक मुरलीधर दत्तू, गौरीशंकर बुरकूल, गोपाळ भगरे, राजेंद्र चरणूकाका पाटील, भारत बेदरे, दयानंद सोनगे, औदुंबर वाडदेकर, रेवणसिद्ध लिगाडे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, ऊस उत्पादक सभासद व तोडणी-वाहतूक ठेकेदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अध्यक्ष पाटील म्हणाले, की संचालक मंडळाच्या नियोजनबद्ध कार्यपद्धतीमुळे दामाजी कारखान्याचे गाळप सुरळीत सुरू आहे. कार्यक्षेत्रातील सर्व शेतकऱ्यांचा संपूर्ण ऊस गाळप होईपर्यंत कारखान्याचा हंगाम सुरू राहणार असून, शेतकऱ्यांनी ऊस तोडणी व वाहतुकीसाठी घाई न करता यंत्रणेला सहकार्य करावे, ऊस उत्पादक सभासदांचा कारखान्यावर असलेला विश्वास आणि ऊस उत्पादकांची बिले पतसंस्था तसेच राष्ट्रीयीकृत व सहकारी बँकांमार्फत वर्ग करण्यात आली असून, काही शेतकऱ्यांना मागणीनुसार वैयक्तिक धनादेश देण्याची व्यवस्थाही करण्यात आली असल्याची माहिती कार्यकारी संचालक जायभाय यांनी दिली.

















