सोलापूर : थकबाकी असताना साखर कारखान्यांची आरआरसी रद्द करण्याचा प्रकार उघड

सोलापूर : लोकमतमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, जिल्ह्यातील भैरवनाथ शुगर आलेगाव व भैरवनाथ शुगर लवंगी या दोन साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या उसाचे पैसे वेळेवर न दिल्याने साखर आयुक्तांनी आरआरसी कारवाई केली होती. या आरआरसी कारवाईनंतर या कारखान्यांनी शेतकऱ्यांना काही रक्कम दिली, मात्र त्यांनी संपूर्ण रक्कम दिल्याचे दाखविले. साखर कारखाना व्यवस्थापनाने साखर सहसंचालकांना थकबाकी क्लीअर केल्याचे पत्र दिले. साखर सहसंचालकांनी शेतकऱ्यांची थकबाकी दिल्याची खात्री न करता पुढील प्रक्रिया केली. ही बाब ऊस नियंत्रण समितीचे सदस्य सुहास पाटील यांच्या लक्षात आली. त्यांनी याबाबत संबंधीतांवर गुन्हे दाखल करण्याचे पत्र दिले आहे.

बातमीत पुढे म्हटले आहे कि, थकबाकी असताना चुकीच्या पद्धतीने आरआरसी कारवाई रद्द करण्याचा घाट घातल्याप्रकरणी साखर सहसंचालक, लेखाधिकारी व भैरवनाथ शुगरच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे पत्र ऊस दर नियंत्रण समितीचे सदस्य सुहास पाटील यांनी सचिवांना दिले आहे. कारखान्यांकडे थकबाकी असल्याचे लक्षात येताच त्यांनी सोलापूर साखर सहसंचालक कार्यालयाकडून माहिती घेतली. थकबाकी नसल्याचे दाखविण्यात आल्याचे लक्षात आले. त्यांनी शेतकऱ्यांसह पुणे साखर आयुक्त कार्यालयाला धडक मारली. तेथे ठिय्या आंदोलन केले गेले. उसाचे पैसे न देता थकबाकी क्लिअर असल्याचे दाखविण्यात आल्याचे साखर आयुक्त सिद्धराम सालीमठ यांच्या लक्षात आणून दिले. त्यानंतर लगेच शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले. असाच प्रकार जिल्ह्यातील इतर साखर कारखान्यांबाबत असू शकतो, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here