सोलापूर : विरोधकांनी जकराया साखर कारखान्याच्या शेजारी १० काटे उभारावेत – अध्यक्ष सचिन जाधव यांचे आव्हान

सोलापूर : जकराया शुगरच्या शेजारी दुसरा काटा उभा करण्याचे वक्तव्य करणाऱ्या विरोधकांना जकराया शुगरचे अध्यक्ष सचिन जाधव यांनी एकच काय दहा काटे उभा करण्याचे खुले आव्हान दिले आहे. सचिन जाधव म्हणाले की, जकराया शुगरच्या काट्यावर बोलणाऱ्या विरोधकांच्या पक्षाच्या घोडेश्वर गणातील उमेदवाराचे पाच ट्रॅक्टर माझ्या कारखान्यावर ऊस वाहतूक करतात. माझ्या कारखान्यावर एकच वजन काटा आहे. त्याच काट्यावरून साखर, डिस्टिलरी, इथेनॉलचे वजन केले जाते. विशेष म्हणजे या भागातील शेतकरीही आपल्या व्यापाराला विकलेल्या मालाचे वजन करतात. त्यामुळे माझ्या कारखान्याच्या वजन काट्यावर माझ्या शेतकऱ्यांचा विश्वास आहे.

जाधव म्हणाले, ज्याचे उसाचे टिपरुसुद्धा कारखान्याला जात नाही, तो माणूस कारखान्याच्या काट्यावर बोलतोय, हे हास्यास्पद आहे. यापुढील काळात मला इंचगाव येथे शंभर एकरवर जागतिक दर्जाचे शिक्षण संकुल उभे करायचे आहे. कामती बुद्रुक या ठिकाणी सुसज्ज असे हॉस्पिटल उभे करायचे आहे. माझा कारखाना माझे कुटुंब आहे. कामगार माझ्या कुटुंबातील सदस्य आहेत. विरोधकांना यापुढे जशाच तसे उत्तर देण्यात येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here