सोलापूर : सहकारमहर्षी कारखान्याचा गळीत हंगाम १ नोव्हेंबर रोजी सुरु झाला असून कारखान्याने गेल्या दोन महिन्यांत, ९ जानेवारीअखेर ५ लाख ९६ हजार १९१ मे. टन उसाचे गाळप करून ५ लाख ४८ हजार ४५० साखर पोत्याचे उत्पादन घेतले आहे. सरासरी साखर उतारा १०.४३ टक्के मिळाला आहे. सध्या प्रतिदिवस ८,५०० मे.टन प्रमाणे उसाचे गाळप सुरू आहे. कारखान्याने नुकताच पाच लाख साखर पोत्यांचा टप्पा ओलांडला. कारखान्यात ५ लाख २५ हजार व्या साखर पोत्याचे पूजन संचालक विराज प्रकाश निंबाळकर यांच्या हस्ते झाले. तर सहवीज निर्मिती प्रकल्पामधून विक्री केलेल्या २ कोटी ८५ लाख वीज विक्री युनिटचे पूजन संचालक महादेव क्षिरसागर यांच्या हस्ते करण्यात आले.
याबाबत कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र चौघुले यांनी सांगितले की, कारखान्याच्यावतीने गतीने गाळप सुरू आहे. कारखान्याच्या सहवीज निर्मिती प्रकल्पांत शुक्रवारी अखेर ४ कोटी ६८ लाख ५८ हजार ०६० युनिट वीज निर्मिती झाली असून त्यामधून २ कोटी ८६ लाख २७हजार ८०० वीज युनिट विक्री केली आहे. कार्यक्रमाला उपाध्यक्ष शंकरराव माने-देशमुख, संचालक लक्ष्मण शिंदे, रावसाहेब मगर, रामचंद्र सिद, रावसाहेब पराडे, डॉ. सुभाष कटके, रामचंद्र ठवरे, जयवंत माने-देशमुख तसेच विनायक केचे यांच्यासह सर्व खातेप्रमुख उपस्थित होते.
















