सोलापूर : कचरेवाडी (ता. मंगळवेढा) येथील युटोपियन शुगर्स लि. या कारखान्याचे यंदाच्या गाळप हंगामासाठी मिलरोलर पूजन अध्यक्ष उमेश परिचारक व मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन परिचारक यांच्या हस्ते झाले. त्यावेळी अध्यक्ष परिचारक यांनी, युरोपियन शुगर या कारखान्याचा १२ वा गळीत हंगाम आहे. यंदा पाऊस चांगला पडल्यामुळे ऊस मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे चालू गळीत हंगामात सहा लाख मे. टन उसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवल्याचे सांगितले.
अध्यक्ष परिचारक म्हणाले की, कारखान्याचे मार्गदर्शक आ. प्रशांत परिचारक यांच्या सूचनेनुसार सांगोला, पंढरपूर, मंगळवेढा व मोहोळ या तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा संपूर्ण ऊस गाळप केला जाईल. ऊस उत्पादकांनी आजपर्यंत ठेवलेल्या विश्वासास पात्र राहावे. कारखान्याचे चीफ टेक्निकल ऑफिसर तुकाराम देवक यांनी, झिरो स्टॉपेज व झिरो लिकेज या टॅगलाईननुसार काम करणार असल्याचे सांगितले. कामगार कल्याण अधिकारी रविराज पाटील यांनी सूत्रसंचालन केले. ईडीपी मॅनेजर अभिजित यादव यांनी आभार मानले.