सोलापूर : युटोपियन शुगर्सने मागील ११ हंगामात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. चालू हंगामात ६ लाख मेट्रिक टन ऊस गाळप करण्याचे आणि बी हेवी मोलॅसेसपासून १.५० कोटी लिटर इथेनॉल उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवले आहे अशी माहिती कारखान्याचे चेअरमन उमेश परिचारक यांनी दिली. कचरेवाडी येथे कारखान्याचा २०२५-२६ या बाराव्या गळीत हंगामाचा बॉयलर पूजन व अग्निप्रदीपन सोहळा मंगळवारी पार पडला. यावेळी ते बोलत होते. शासनाने १ नोव्हेंबरपासून गाळप परवाना दिल्याने उत्कृष्ट रिकव्हरीचा ऊस मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कारखाना पहिल्या दिवसापासून पूर्ण क्षमतेने सुरू राहील. यावर्षी १० हार्वेस्टर मशीन, २५० ट्रॅक्टर आणि १५० मिनी ट्रॅक्टर कराराने घेतले असून गाळपाची तयारी पूर्ण झाल्याचे ते म्हणाले.
चेअरमन उमेश परिचारक व मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन परिचारक यांच्या हस्ते सोहळ्याचे पूजन करण्यात आले. सिनिअर इन्स्ट्रुमेंट इंजिनिअर कदम यांच्या हस्ते सपत्नीक महापूजा झाली. युनिट हेड तुकाराम देवकते यांनी अग्निप्रदीपन केले. रोहन परिचारक यांनी संपूर्ण उसाचे गाळप करण्यासाठी कारखाना सज्ज आहे. दिवाळीनिमित्त प्रतिकिलो २५ रुपये दराने साखर वाटप करण्यात येणार आहे असे सांगितले. कामगारांना दरवर्षीप्रमाणे ८.३३ टक्के बोनस दिला जाईल अशी घोषणा त्यांनी केली. यावेळी ऊस उत्पादक शेतकरी, अधिकारी, खातेप्रमुख व कामगार उपस्थित होते. ईडीपी मॅनेजर अभिजित यादव यांनी आभार मानले.
Home Marathi Indian Sugar News in Marathi सोलापूर : युटोपियन शुगर्सचे यंदा सहा लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट