सोलापूर : पिंपळनेर येथील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याची २०२६ ते २०३१ या कालावधीसाठी २१ संचालकांची निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली. मंगळवारी (ता. १०) अध्यक्ष व उपाध्यक्ष पदांच्या निवडी झाल्या. या प्रसंगी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष, माजी आमदार बबनराव शिंदे यांची पुन्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली. ज्येष्ठ संचालक पोपटराव गायकवाड यांची सर्वानुमते उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कुर्डुवाडीच्या उपजिल्हाधिकारी जयश्री आव्हाड यांनी काम पाहिले.
विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या स्थापनेपासून संचालक मंडळाच्या सर्व निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. अध्यक्ष म्हणून सातव्यांदा माजी आमदार बबनदादा शिंदे यांची एकमताने निवड झाली आहे. त्यांच्या कुशल नेतृत्वामुळे साखर कारखान्याची मोठी भरभराट झाली असून राज्य व देशपातळीवर कारखान्याने मोठा नावलौकिक मिळविला आहे असे यावेळी सांगण्यात आले. संचालक रणजितसिंह शिंदे, विक्रमसिंह शिंदे, पोपट चव्हाण, अमोल चव्हाण, पंडित पाटील, विलास कौलगे, अशोक मिस्किन, कैलास तोडकरी, सचिन देशमुख, रमेश येवले-पाटील, राजेश खोत, संजय लोकरे, श्रीकांत पाटील, लाला मोरे, राजाराम थोरात, राजाराम नाळे, जितेंद्र गायकवाड आदी उपस्थित होते.

















