सोलापूर : गळीत हंगाम संपताच तोडणी वाहतूक बिले देणारा विठ्ठलराव शिंदे हा राज्यातील एकमेव कारखाना – चेअरमन बबनराव शिंदे

सोलापूर : विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे युनिट नं.१ पिंपळनेर व युनिट नं.२ करकंब कारखान्याकडून या हंगाम अखेरचे आतापर्यंतचे ऊस तोडणी वाहतूक बिल अदा करण्यात आले असून हंगाम अखेर दि. १ ते १७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीतील ऊस तोडणी वाहतूक बील वाहन मालकांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे, अशी माहिती कारखान्याचे संस्थापक-चेअरमन बबनराव शिंदे यांनी दिली.

शिंदे म्हणाले, या हंगामात आजअखेर युनिट नं. १ कडे १५ लाख ५४ हजार ५६२ मे.टन गाळप होवून १० लाख ३३ हजार ९०० क्विटल साखर पोत्याचे उत्पादन झाले आहे. तसेच युनिट नं. २ कडे ५ लाख २४ हजार ४५१ मे.टन गाळप होवून ४ लाख ८६ हजार १५० असे एकूण २० लाख ७९ हजार ०१३ मे.टन ऊसाचे गाळप होवून १५ लाख २० हजार ०५० क्विटल साखर उत्पादीत झाली आहे.

हंगाम अखेर ऊस तोडणी वाहतूक बिलासाठी १७८ कोटी ४४ लाख रुपये अदा करण्यात आलेले आहेत. गळीत हंगाम संपताच तोडणी वाहतूक बिले देणारा विठ्ठलराव शिंदे हा राज्यातील एकमेव कारखाना आहे. तसेच या हंगामात दोन्ही युनिटकडे गाळपास आलेल्या ऊसास हंगामाचे सुरूवातीपासून १० दिवसाला ऊस बिलाचे पेमेंट अदा केलेले आहे. ऊसास प्रति मे.टन ३०२५ रुपये प्रमाणे ऊस बिलाचा हप्ता अदा करण्यात आला असून या हंगाम अखेर ऊस बिलासाठी ६२८ कोटी ८९ लाख रुपये अदा केलेले आहेत.

त्रिपक्षीय करारानुसार कारखान्यात काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांना जानेवारी २०२६ पासून १० टक्के पगार वाढ लागू करून देण्यात आली आहे. तसेच सन २०२५-२६ गळीत हंगाम यशस्वी केल्याबद्दल अधिकारी व कर्मचारी यांना १५ दिवसाचा पगार बक्षिस म्हणून अदा करण्यात येणार आहे, अशी माहिती कार्यकारी संचालक डॉ. संतोष डिग्रजे यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here