सोलापूर : मकाई सहकारी साखर कारखाना हा सभासदांच्या मालकीचा असून, येत्या काळात कारखान्याचा क्षमता विस्तार करणार आहोत. मकाई कारखान्याचे कामकाज राजकारण विरहित केलं जाईल. कारखान्याचे कामकाज संस्थापक लोकनेते माजी मंत्री स्व. दिगंबरराव बागल यांच्या विचारानेच सुरू आहे. कारखान्याच्या विकासाच्या किंवा हिताच्या धोरणाआड जर कोणी येत असेल तर त्याची भविष्यात गय केली जाणार नाही, असा इशारा भाजप महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा व राज्य सहकारी साखर कारखाना महासंघाच्या संचालिका रश्मी बागल यांनी दिला. श्री मकाई कारखान्याची २६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा कारखाना कार्यस्थळावर झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. सभेच्या सुरवातीला स्व. दिगंबरराव बागल यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे पूजन ज्येष्ठ सभासद शेतकरी जालिंदर झांजुर्णे, धर्मराज जगताप, अंबऋषी भिल, विठ्ठल लोहार व उपस्थित सर्व संचालक मंडळाच्या हस्ते करण्यात आले.
स्वागत जनरल मॅनेजर हरिश्चंद्र खाटमोडे यांनी केले. ठरावाचे वाचन कार्यकारी संचालक सुनील दळवी यांनी केले. चेअरमन दिनेश भांडवलकर यांनी विषय पत्रिकेवरील विषय वाचन केले. या ठरावांना उपस्थित सभासदांनी एकमुखाने मंजुरी दिली. चेअरमन भांडवलकर म्हणाले, कारखाना आगामी कालावधीमध्ये निश्चितपणे राज्यातील इतर कारखान्यांपेक्षा चांगली कामगिरी करून दाखवेल. विरोधकांच्या अपप्रचाराला कोणी बळी पडू नये. दिवाळीसाठी कामगारांना बोनस देण्याबाबत संचालक मंडळात निश्चितपणे विचार करण्यात येईल. यावेळी ‘आदिनाथ’चे माजी चेअरमन धनंजय डोंगरे, आदिनाथचे माजी व्हाइस चेअरमन केरू गव्हाणे, संचालक बाळासाहेब पांढरे, डॉ. विजय रोकडे, माजी संचालक नामदेव भोगे, महावीर तळेकर, रंगनाथ शिंदे, काशिनाथ काकडे आदींसह सर्व विभाग प्रमुख व हजारो सभासद, शेतकरी उपस्थित होते. शेखर जोगळेकर यांनी सूत्रसंचालन केले. सतीश नीळ यांनी आभार मानले.