सोलापूर : बारामती येथील ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट अंतर्गत कृषी विज्ञान केंद्राकडून मिळालेले तंत्रज्ञान आणि मार्गदर्शनाचा वापर करून माढा तालुक्यातील बेंबळे येथील भरतकुमार दत्तात्रेय भोसले यांनी उसाचे एकरी तब्बल ११६ टन घेण्यामध्ये यश संपादन केले आहे. भरतकुमार यांनी बारामती ‘केव्हीके’च्या साह्याने शेतात काही शुल्क भरून स्वयंचलित हवामान केंद्र उभारले. त्याला जोडलेल्या सेन्सरच्या माध्यमातून हवामानाचे घटक, पाणी आदींबाबत विविध निरीक्षणे सातत्याने नोंदवली. वाण को ८६०३२ हेच ठेवण्यात आले. रोपे केव्हीकेने पुरवली. दहा ऑगस्ट, २०२४ मध्ये पाच बाय दीड फूट अंतरावर लागवड झाली. सिंचन पूर्णपणे ठिबकद्वारे करण्यात आले. पीकवाढीच्या अवस्था, त्यानुसार घेत असलेल्या नोंदीवरून ॲपद्वारे शास्त्रज्ञांकडून अन्नद्रव्ये, पाणी, कीडनाशके व एकूणच व्यवस्थापनाबाबत सातत्याने सल्ले देण्यात आले. त्याचा खूप फायदा झाल्याचे भोसले यांनी सांगितले. त्यांचा हा प्रयोग परिसरासाठी कौतुकाचा व अनुकरणीय विषय झाला आहे.
दरवर्षी एकरी ५० ते ५५ टनांपर्यंत साध्य होणाऱ्या उत्पादनात दुपटीने वाढ होण्यासह पाण्यात किमान ५० टक्क्यांपर्यंत बचत झाल्याचे भोसले यांनी सांगितले. बेंबळे गावात भरतकुमार यांची आठ एकर शेती आहे. त्यात दीड एकर द्राक्षे व दहा गुंठ्यागत शेडनेटमध्ये भाजीपाला आहे. पाच ते साडेपाच एकरांत ऊस असतो. ते आपला भाऊ शत्रुघ्न यांच्यासोबत पूर्णवेळ शेती करतात. भरतकुमार यांनी चुलतभाऊ हर्षल यांच्या माध्यमातून बारामती अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट अंतर्गत बारामती कृषी विज्ञान केंद्र (केव्हीके) येथे भेट दिली होती. तेथे एआय (कृत्रीम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञानाच्या आधारे ऊस प्रकल्पाची माहिती त्यांनी घेतली. एआयच्या प्रयोगात त्यांनी एक एकर क्षेत्र निश्चित केले. तर तुलनेसाठी प्रचलित पद्धतीच्या व्यवस्थापनाचा पाच एकर ऊस ठेवण्यात आला. एआय प्रयोगात एकरी उत्पादन खर्च सुमारे सव्वा लाख आला. उत्पादन एकरी ११६ टन मिळाले. तर प्रचलित पद्धतीच्या उसासाठी उत्पादन खर्च ८० हजार रुपये, तर उत्पादन ५५ टन मिळाले. साखर कारखान्याकडून सुमारे ३१५० रुपये प्रति टन दर मिळत असल्याचे भरतकुमार सांगतात. प्रति टन तीस हजार रुपये दर गृहीत धरला तरी ‘एआय’ पद्धतीच्या उसातून एक लाख ३८ हजार रुपयांचा नफा मिळतो हे प्रयोगातून सिद्ध झाले.

















