सोलापूर: मोहोळ तालुक्यातील वटवटे येथील जकराया शुगर्सने एका दिवसात १७ हजार ५०० किलो गॅसनिर्मिती केली आहे. वीस हजार किलो प्रतिदिन क्षमता असलेल्या या प्रकल्पातून प्रथमच इतक्या उच्चांकी स्तरावर गॅसचे एका दिवसात उत्पादन करण्यात आले. प्रतिदिन वीस हजार किलो निर्मिती क्षमता असलेला हा देशातील एकमेव प्रकल्प आहे. सीबीजी प्रकल्पातील उच्चांकी गॅस निर्मितीबद्दल कारखान्याचे कार्यकारी संचालक सचिन जाधव आणि पूर्णवेळ संचालक राहुल जाधव यांनी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे. जकराया शुगरने केवळ उसाचे गाळप करून साखर उत्पादित करण्यापेक्षा विविध उपपदार्थ निर्मितीला प्राधान्य दिले आहे. संस्थापक अध्यक्ष ॲड. बी. बी. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याने देशातील सर्वाधिक क्षमतेने गॅसनिर्मिती करणारा कारखाना म्हणून नावलौकिक प्राप्त केल्याची माहिती कार्यकारी संचालक जाधव यांनी दिली.
जकराया शुगर्सतर्फे १५ फेब्रुवारी २०२४ ला प्रकल्पाची सुरवात झाली होती. अतिशय खडतर परिस्थितीतून सुरू केलेला प्रकल्प आता देशातील साखर कारखानदारांसमोर पथदर्शी ठरत आहे. सुरुवातीला यात तांत्रिक अडचणी आल्या. मात्र, जाधव बंधूंनी सर्व कामगारांच्या मदतीने प्रयत्न केले. अध्यक्ष बी. बी, जाधव, कार्यकारी संचालक सचिन जाधव, पूर्णवेळ संचालक राहुल जाधव यांनी या व्यवसायातील कोणताही अनुभव पाठीशी नसताना, तज्ज्ञ सल्लागाराच्या मार्गदर्शनाशिवाय कामगारांच्या मदतीने विविध उपपदार्थ निर्मितीत नवे मापदंड तयार केले. आता सर्व तांत्रिक अडचणींवर मात करीत शुद्धता आणि उच्च गुणवत्ता या जोरावर लवकरच २० हजार किलोचाही टप्पा ओलांडू, असे सचिन जाधव यांनी सांगितले. तसेच भविष्यातील मागणी लक्षात घेऊन आणखी १५ हजार किलोचा प्रकल्प उभारण्याचा प्रयत्न असेल असे त्यांनी सांगितले.