कोल्हापूर : मागील हंगामातील ४०० रुपये आणि यंदाच्या हंगामात ३,५०० रुपये दर द्यावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनामुळे जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. आमची स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते तथा माजी खासदार राजू शेट्टी आणि शेतकऱ्यांशी चर्चा झाली आहे. ही चर्चा अंतिम टप्प्यात आहे, असे आमदार सतेज पाटील यांनी सांगितले.
स्वाभिमानीच्या आंदोलनात ठिकठिकाणी ऊस वाहतूक गाड्यांची जाळपोळ करण्यात आली आहे. आंदोलनावर मार्ग निघावा, अशी भावना शेतकऱ्यांसह कारखानदारांची आहे. त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ऊसाचा हंगाम सुरू होण्यास विलंब होत असल्याने कारखान्याचे नुकसान होत आहे. याबाबत आमदार सतेज पाटील म्हणाले की, आंदोलनामुळे ऊसतोड मजुरांच्या टोळ्या परत जाण्याच्या मार्गावर आहेत. टोळ्या परत गेल्या तर कारखानदारांचे चार ते पाच कोटीचे नुकसान होईल. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी राजू शेट्टी यांच्याशी चर्चा करावी. गरज पडल्यास मुख्यमंत्र्यांनी त्यांना मुंबईला बोलावून घेऊन चर्चा करावी, अशी मागणी सतेज पाटील यांनी केली. दरम्यान, शेट्टी यांच्यासोबत चर्चा सुरू आहे. येत्या दोन दिवसांत तोडगा निघेल. पण, पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने ऊसतोड केल्याचा शेट्टी यांचा आरोप चुकीचा आहे, असे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.











