पुणे : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या स्वतःच्या कार्यक्षेत्रात दहा ते अकरा लाख टन ऊस उपलब्ध आहे. मात्र कारखान्याने यंदाच्या गाळप हंगाम २०२४- २५ मध्ये १३ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. ३३ हजार एकर ऊस लागवड नोंद कारखान्याकडे आहे, अशी माहिती सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी दिली. कारखान्यात येणाऱ्या हंगामाच्या तयारीचा प्रारंभ मिलरोलरचे पूजन करून जगताप यांच्या हस्ते झाला. या वेळी ते बोलत होते. उपाध्यक्ष बाळासाहेब कामथे, संचालक शिवाजीराजे निंबाळकर, संग्राम सोरटे, शैलेश रासकर, ऋषिकेश गायकवाड, हरिभाऊ भोंडवे, सचिव कालीदास निकम आदी उपस्थित होते.
अध्यक्ष जगताप म्हणाले की, कारखान्याकडे जिरायती भागातील किती ऊस उपलब्ध होतो हे पाहावे लागेल. धरण क्षेत्रात पाऊस झाला नसल्याने पाणी कमी आहे. त्यामुळे दहा लाख टनापर्यंत ऊस गाळपास उपलब्ध होण्याचा अंदाज आहे. जिल्ह्यात कारखान्याची २८७३ एफआरपी सर्वाधिक आहे. कारखान्याने सभासदांना एफआरपी पेक्षा २२७ रुपये अधिक दिले आहेत. सभासद शेतकऱ्यांनी कारखान्याकडे ४५ लाख रोपांची मागणी केली आहे. पूर्व हंगामात दोन ते अडीच कोटी रोप लागवड कार्यक्षेत्रात होईल असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.











