पुणे : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने सन २०२५- २६ साठी ऊस लागवड धोरण जाहीर केले आहे. त्यानुसार आडसाली लागवड हंगाम १ जुलैपासून सुरू होणार आहे. पूर्वहंगामी सप्टेंबर ते २९ नोव्हेंबर, सुरू हंगाम १ डिसेंबर ते २८ फेब्रुवारी दरम्यान होईल. जर एखाद्या सभासदाने कारखान्याकडे बोगस ऊस नोंद केल्यास ५०० रुपये ऊस बिलातून वसूल करण्यात येतील असा इशारा देण्यात आला आहे. तसेच हार्वेस्टर तोडणीसाठी विशेष प्रोत्साहन देण्याचा निर्णय कारखाना प्रशासनाने घेतला आहे. पाडेगाव ऊस संशोधन केंद्र व वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या सल्ल्याने कारखान्याने ऊस लागवड धोरण आखले आहे.
याबाबत ॲग्रोवनमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी सांगितले, की कारखाना यांत्रिकीकरणाला प्राधान्य देत असून, हार्वेस्टरद्वारे तोडणी झाल्यास प्रति टन ५० रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. सभासदांनी शेतात किमान साडेचार फूट अंतर ठेवून ऊस लागवड करावी. हार्वेस्टर ऊस तोडणीसाठी प्राधान्य दिले आहे. कारखान्याकडे नोंदविलेला ऊस इतर कारखान्यास संमतीशिवाय देऊ नये. अन्यथा त्यांना साखर, ऊस रोपे, बियाणे, ताग, सोयाबीन बियाणे, कंपोस्ट खत आदी सवलती बंद करण्यात येतील. दरम्यान, २ ते ३ जुलै यांदरम्यान लागवड नोंदी बंद राहतील. ४ ते १४ जुलै यांदरम्यान लागवड नोंदी ज्या-त्या तारखेस घेण्यात येतील. १५ जुलैपर्यंत नोंदी अधिक आल्यास ड्रॉ काढण्यात येणार आहे. सभासदांनी एकूण लागवड क्षेत्रापैकी आडसाली ४० टक्के, पूर्वहंगामी १५ टक्के, सुरू १० टक्के व खोडवा ३५ टक्के या प्रमाणात लागवड करण्याचे आवाहन कारखान्याने केले आहे.