पुणे : जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यातील प्रगतशील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सांगली जिल्ह्यात अभ्यास दौरा केला. अभ्यास दौऱ्यादरम्यान शेतकऱ्यांनी ऊस पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सांगलीतील नामवंत शेतकऱ्यांची भेट घेतली. अभ्यास दौऱ्याचे यशस्वी आयोजन आत्मा कृषी विभागाचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक धोंडिभाऊ पाबळे यांनी केले. शेतकऱ्यांनी ऊस उत्पादनाच्या क्षेत्रात राज्यात नावाजलेले शेतकरी, त्यांच्या शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित उत्पादनवाढीच्या पद्धती जाणून घेतल्या.
जुन्नर व आंबेगावच्या शेतकऱ्यांनी अमोल लकेसर यांच्या १४७ टन उत्पादन देणाऱ्या फार्मची पाहणी करून उत्पादन तंत्र समजून घेतले. कृषीनिष्ठ ऊस भूषण अशोक खोत यांच्या मायक्रो स्प्रिंकलरद्वारे विकसित प्लॉटची पाहणी केली. खोत यांनी एकरी तब्बल १६८ टन ऊस उत्पादन घेतले आहे. शेतकऱ्यांना कृषीरत्न संजीव माने यांच्या शेतातील ‘एआय’ आधारित तंत्रज्ञानाचा वापर प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळाली. प्रशांत पाटील यांनी ऊस पिकाचे आर्थिक नियोजन याविषयी मार्गदर्शन केले. उद्योजक डॉ. धनराज मुळीक यांच्या प्रगतशील शेती पद्धतीची शेतकऱ्यांनी माहिती घेतली. वसंत निकम यांनी मार्गदर्शन केले. दौऱ्यात विकास चव्हाण, विकास वाळुंज, ओमकार वाळुंज, कृषी मित्र उत्तम जाधव, बाबाजी बांगर, संपत चिंचवडे, बाबाजी बोऱ्हाडे आदी सहभागी झाले होते.