सांगली : शेतकऱ्यांचे नेते स्व. शरद जोशी व हुतात्मा बाबू गेनू यांचा स्मृतिदिन दि. १२ डिसेंबर रोजी आहे. त्या दिवसापर्यंत साखर आयुक्तालयाचे नाव ‘ऊस आयुक्तालय’ असे करावे, अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी केली. जर मागणी मान्य केली नाही तर पुण्यतिथीचा कार्यक्रम साखर आयुक्तालयात करत नामकरण फलक लावणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.
रघुनाथदादा म्हणाले, भारत सरकारने खुली अर्थव्यवस्था स्वीकारल्यामुळे दोन साखर कारखान्यांमधील अंतराची अट रद्द होणे आवश्यक आहे. याबाबत २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सत्ता आल्यास अंतराची अट रद्द करू, असे आश्वासन दिले होते. ते पाळलेले नाही. आम्ही संघटनेच्या वतीने दि. ५ डिसेंबरपासून जनजागरण सप्ताह आयोजित केला आहे. त्याची सुरुवात येडेमच्छिंद्र येथून होत असून ती कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगर, सातारा या जिल्ह्यातून जाणार आहे. दि. १२ रोजी पुणे येथील आयुक्तालयाच्या समोर जनआंदोलन करण्यात येणार आहे. तरी शेतकरी बांधवांनी हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन पाटील यांनी केले.


















