भारतात यंदा साखरेचा वापर २८० लाख टनापर्यंत मर्यादीत राहण्याचा अंदाज : इस्मा

नवी दिल्ली : येत्या सप्टेंबर महिन्यामध्ये संपणाऱ्या चालू हंगामात (२०२४-२५) भारतातील साखरेचा वापर कमी होऊन सुमारे २८० लाख टनांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे, असे इंडियन शुगर अँड बायो मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन (इस्मा) ने म्हटले आहे. मागील हंगामात २९० लाख टनांच्या विक्रमी खपाच्या तुलनेत हा खप कमी असेल. यावर्षी साखरेच्या वापराच्या ट्रेंडमध्ये बदल झाला आहे. एप्रिल आणि मे यांसारख्या उन्हाळ्याच्या महिन्यांत साखरेची मागणी कमी राहिली आहे.

‘इस्मा’चे महासंचालक दीपक बल्लानी म्हणाले की, सरकारने यावर्षी जारी केलेला साखर विक्री कोटा गेल्या वर्षीपेक्षा कमी आहे. सर्व आकडेवारी आणि अंदाजांनंतर, आम्हाला वाटत नाही की वापर २८० लाख टनांपेक्षा जास्त होईल. मासिक कोटा देशांतर्गत साखरेची उपलब्धता आणि किमती नियंत्रित करण्यासाठी सरकारने ठरवलेला मे २०२५ चा मासिक साखर विक्री कोटा गेल्यावर्षीच्या २७ लाख टनांच्या तुलनेत १३ टक्क्यांनी घसरून २३.५० लाख टनांवर आला. तसेच, साखर वर्ष २०२४-२५ च्या पहिल्या सात महिन्यांत (ऑक्टोबर ते मे) एकत्रित विक्री कोटा १८४.५० लाख टन झाला आहे. मागील वर्षीच्या समान कालावधीतील १९६.५० लाख टनांपेक्षा हा कोटा ६ टक्क्यांनी कमी आहे. २०२३-२४ साठी सरकारने जारी केलेल्या २९१.५ लाख टनांच्या कोट्याच्या तुलनेत कारखान्यांची साखर विक्री २९० लाख टन झाली.

बल्लानी म्हणाले की, २०२३-२४ मधील सार्वत्रिक निवडणुका आणि आणि बांगलादेशसारख्या देशांकडे तस्करी झाल्याची तक्रार आदींमुळे भारतातील साखरेचा वापर २९ दशलक्ष टनांच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचला. एप्रिल-मे महिन्यात मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे उन्हाळ्याच्या महिन्यांत आवक जास्त होती, असे बल्लानी म्हणाले. ते म्हणाले की, यावर्षी आपल्याकडे असे काहीही घडलेले नाही. उन्हाळ्यात आणि दिवाळीच्या सणापूर्वी साखरेचा वापर सर्वाधिक होतो. एफएमसीजी क्षेत्रात मागणीत काही प्रमाणात घट झाली आहे. साखरेचे प्रमुख ग्राहक संस्थात्मक खरेदीदार आहेत, जे एकूण वापराच्या सुमारे ७० टक्के आहेत, तर उर्वरित वाटा किरकोळ विक्रीचा आहे. देशातील साखरेच्या वापराच्या ट्रेंडचा व्यापक अभ्यास करण्यासाठी इस्माने आघाडीच्या सल्लागार पीडब्ल्यूसीची नियुक्ती केली आहे.

बल्लानी म्हणाले की, हा अभ्यास महत्त्वाचा आहे, कारण अलिकडच्या काळात साखरेशिवाय पर्यायांची मागणीदेखील दिसून आली आहे. आम्ही साखर वापरकर्त्यांच्या, संस्थात्मक आणि किरकोळ, वापराच्या संपूर्ण मॅपिंगवर एक व्यापक अभ्यास सुरू केला आहे. या अभ्यासात उपभोगाच्या संदर्भात क्षेत्रनिहाय ट्रेंड आणि भविष्यातील रोडमॅपचे मूल्यांकन केले जाईल. हा अभ्यास सुमारे दोन महिन्यांत पूर्ण होण्याची शक्यता आहे. गेल्या दशकात साखरेचा वापर दरवर्षी सुमारे १.८ टक्क्यांनी वाढत आहे. बल्लानी म्हणाले की, २०२४-२५ हंगामासाठी निव्वळ साखर उत्पादन २६१ ते २६२ लाख टनांच्या यांदरम्यान असण्याचा अंदाज आहे, ज्यामध्ये ३३-३४ लाख टन इथेनॉलमध्ये वळवण्याचा समाविष्ट आहे. मे महिन्याच्या मध्यापर्यंत, उत्पादन २५७.४४ लाख टन होते आणि सुमारे ५३३ कारखान्यांनी हंगामासाठी कामकाज बंद केले आहे. दक्षिण भारतातील काही भागात जून-ऑगस्ट दरम्यान विशेष हंगामात सुमारे ४-५ लाख टन अतिरिक्त उत्पादन अपेक्षित आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here