बेळगाव : केंद्र व राज्य सरकारने साखर कारखान्यांना आता दुहेरी स्रोतांपासून म्हणजेच उसाबरोबरच धान्यांपासून इथेनॉल निर्मिती करण्यास परवानगी दिल्यामुळे प्रकल्प १२ महिने चालविता येणार आहेत. या निर्णयामुळे ऊस, मका, तांदूळ उत्पादकांवर दूरगामी परिणाम होतील. प्रामुख्याने आर्थिकदृष्ट्या अडचणीत असणाऱ्या आणि सतत कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे राज्य सरकारच्या मदतीवर अवलंबून रहावे लागणाऱ्या साखर कारखान्यांनाही मोठा दिलासा देणारा हा निर्णय आहे. मात्र वर्षभर निर्मितीसाठी साखर कारखान्यांना आपल्या प्रकल्पांमध्ये सुधारणा कराव्या लागणार आहेत. प्रत्येक कारखान्याला धान्यापासून जलरहित मद्यार्क (इथेनॉल) उत्पादन घेण्यासाठी शासनाची पूर्व मान्यता घेणे आवश्यक आहे.
सरकारने पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाला परवानगी दिल्यानंतर देशभरात इथेनॉल उत्पादनाला चालना मिळाली. त्यामुळे साखर कारखान्यांना साखरेचा पाक, उसाचा रस आणि मळीपासून इथेनॉल निर्मितीला परवानगी दिली होती. यातून राज्यातील बहुतेक साखर कारखान्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास फार मोठा हातभार लागला. या निर्णयामुळे कारखानदारांना दिलासा मिळाला आहे. आता केंद्र व राज्य सरकारने साखर कारखान्यांना धान्ऱ्यांपासून इथेनॉल निर्मितीस परवानगी दिली आहे. त्यामुळे कारखान्यांना उर्वरित ६ महिन्यांमध्येही धान्यांपासून प्रामुख्याने मक्यापासून इथेनॉल निर्मिती करता येईल. सध्या इथेनॉलमुळे मक्याला मागणी वाढली आहे. भारतीय कृषी संशोधन परिषदेने मक्याची आजवर २६५ वाणे विकसित केली आहेत. त्यापैकी ७७ संकरित आहेत. ३५ बायो फोर्टिफाइड वाण आहेत. तरीही भारताची हेक्टरी उत्पादकता ३.७ टन आहे. ही उत्पादकता कमी आहे. यंदा देशात ४२३ लाख टन उत्पादन झाले आहे. २०४७ पर्यंत ते ८६० लाख टनांपर्यंत पोहोचू शकते, असा अंदाज आहे.