मराठवाड्यातील साखर कारखान्यांनी उसाला प्रतिटन साडेतीन हजार रुपये दर द्यावा : माजी खासदार राजू शेट्टी

लातूर : मराठवाड्यातील साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांना उसाला किमान साडेतीन हजार प्रतिटन दर दिला पाहिजे. एवढा दर देत नसतील तर ऊस गाळपाला देणार नाही, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली पाहिजे, असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पानगाव (ता. रेणापूर) येथे आयोजित ऊस परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. मनेसेचे नेते दिलीपबापू धोत्रे व ऊसतज्ज्ञ पांडुरंग आव्हाड यांची प्रमुख उपस्थित होती. शेट्टी म्हणाले, साखर कारखानदार शेतकऱ्यांना काटेमारी व रिकव्हरी चोरीच्या माध्यमातून लुटत आहेत. शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी दिली जात नाही. तोडणी वाहतूकदार पैशाची मागणी करत आहेत. या सर्व फसवणुकीविरोधात शेतकऱ्यांनी एकजूट होऊन लढले पाहिजे.

धोत्रे यांनी मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी साखर कारखानदारांच्या विरोधात पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांप्रमाणे एकजूट करून एफआरपी पदरात पाडून घेतली पाहिजे, असे सांगितले. आव्हाड यांनी एक एकरमध्ये शंभर टन ऊस उत्पादनाचा कानमंत्र शेतकऱ्यांना दिला. परिषदेचे आयोजक मनसे शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष संतोष नागरगोजे यांनी पन्नगेश्वर कारखान्याने शेतकऱ्यांचे भाग व अन्य देणी न दिल्यास कारखाना चालू न देण्याचा इशारा दिला. परिषदेला मनसे जिल्हाध्यक्ष डॉ. नरसिंह भिकाणे, नांदेड जिल्हाध्यक्ष माँटीसिंग जहागीरदार, शेतकरी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष भागवत शिंदे, विद्यार्थी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष किरण चव्हाण, शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग कदम, जिल्हा सचिव संतोष दाणे, रेणापूर तालुकाध्यक्ष बाळासाहेब मुंडे यांच्यासह पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here