पुणे : साखर उद्योग हा सहजसोप्या पद्धतीने चालणारा उद्योग नाही. ग्राहक व समाजाच्या आरोग्याच्या दृष्टीने गुणवत्तापूर्ण उत्पादने निर्माण करण्यासाठी साखर कारखान्यांनी नवीन तंत्रज्ञान जलद आत्मसात केले पाहिजे तसेच साखर कारखान्यांसाठी आर्थिक शिस्त महत्त्वाची असल्याचे मत भारतीय रिझर्व्ह बँकेचे व ‘नाबार्ड’चे संचालक सतीश मराठे यांनी व्यक्त केले. पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित ‘साखर उद्योगाच्या उत्कर्षासाठी अर्थकारणाची दिशा’ या विषयावरील परिषदेचे उद्घाटन मराठे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. त्या प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड, प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, अध्यासन प्रमुख प्रा. डॉ. अनिल कारंजकर, डॉ. मुकुंद तापकीर, पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक आदी उपस्थित होते. महाराष्ट्रातील विविध विभागांतील सहकारी व खासगी साखर कारखान्यांचे प्रतिनिधी, प्राध्यापक आणि विद्यार्थी सहभागी झाले.
उद्योगाबाबत असलेले गैरसमज दूर करून भविष्यातील आव्हानांना तोंड द्यावे, असे मत परिषदेच्या मान्यवरांनी व्यक्त करण्यात आले. सतीश मराठे, शेखर गायकवाड, डॉ. अजित देशमुख, राजेंद्र गांगर्डे व सीए तानाजी जाधव यांनी मार्गदर्शन केले. दुपारच्या सत्रात साखर उद्योगाच्या उत्कर्षासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग या विषयावर पांडुरंग राऊत, डी.एम. रासकर, डॉ. सुरेश पवार व अजित चौगुले यांनी विचार मांडले. परिषदेचा समारोप सहकार निवडणूक प्राधिकरणाचे आयुक्त अनिल कवडे यांच्या हस्ते झाला.