तिसऱ्या खोडव्याला साखर कारखान्यांनी अडथळा करू नये : साखर आयुक्तांचे स्पष्ट निर्देश

पुणे : राज्यात ऊस उत्पादक शेतकरी प्रामुख्याने एक लागण आणि दोन खोडवे पीक घेत असतात. तथापि, पाडेगाव येथील मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्राने ठिबक सिंचनाखाली पूर्व हंगामी ऊस लागण व दोन खोडवे, तसेच एक लागण व तीन खोडवे घेण्याबाबत तांत्रिक शिफारस केली आहे. त्यामुळे साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचे उसाचे तिसरा खोडवा नोंदणीसाठी अडवणूक करू नये, अशा परिपत्रकीय सूचना साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी सर्व साखर कारखान्यांना दिल्या आहेत. तसेच, या सूचनांची अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने सर्व प्रादेशिक साखर सहसंचालकांनी आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व साखर कारखान्यांची बैठक घेऊन ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून द्यावी, असेही त्यांनी परिपत्रकात पुढे म्हटले आहे.

दैनिक ‘पुढारी’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, शेतकऱ्यांच्या मागणीनुसार काही साखर कारखाने तिसऱ्या खोडव्याचा ऊसनोंदणी करण्यास टाळाटाळ करीत असल्याबाबत तक्रार साखर आयुक्तालयास प्राप्त झालेल्या आहेत. त्यास अनुसरून पाडेगांव येथील मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्राकडून अभिप्राय मागविण्यात आले होते. त्यास अनुसरूनच परिपत्रकीय सूचना जारी केल्या आहेत. पाडेगाव मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्राच्या ऊस विशेषज्ज्ञांनी खोडवा ठेवताना काही बाबींची काळजी घ्यावी, असे नमूद केले आहे. त्याबाबी पुढीलप्रमाणे. खोडवा ऊस घेण्यासाठी विद्यापीठाने शिफारशीत केलेल्या ऊस वाणांचा खोडवा ठेवावा. उदाहरणार्थ को. 86032, फुले 0265, फुले 10001, फुले 15012, फुले 13007, फुले 15006. लागणीचा ऊस 15 फेबुवारीपूर्वी तुटला असेल, अशा उसाचाच खोडवा ठेवण्यात यावा. दुसरा खोडवा ऊसपिकाची तोडणी 15 फेबुवारीपूर्वी तुटलेल्या उसाचाच तिसरा खोडवा ठेवण्यात यावा. प्रतिएकर तिसऱ्या खोडवा ऊस पिकाच्या फुटव्यांची संख्या अंदाजे 25 ते 30 हजार इतकी असावी. दुसरा खोडवा ऊसपीक तुटल्यानंतर गवताळवाढ रोगाची लक्षणे पाच टक्क्यांपेक्षा कमी असावी. दुसरा खोडवा ऊस पीक तुटल्यानंतर काणी रोगाची लक्षणे पाच टक्क्यांपेक्षा कमी असावी.

तिसरा खोडवा ऊस पिकांमध्ये खोडकिडीचा प्रादुर्भाव जास्त असल्यास खोडवा पीक घेऊ नये. तिसरा खोडवा ऊस पिकामध्ये खवले कीडीचा प्रादुर्भाव जास्त असल्यास खोडवा पीक घेऊ नये. दुसऱ्या खोडव्याची प्रतिएकर उसाचे उत्पादन 45 ते 50 टन निघाल्यास तरच तिसरा खोडवा ठेवण्यात यावा. तिसऱ्या खोडव्यासाठी विद्यापीठाने शिफारशीत केलेल्या संतुलित अन्नद्रव्यांची मात्रा वापरावी. (250 किलो नत्र, 115 किलो स्फुरद, 115 किलो पालाश प्रतिहेक्टर) माती परीक्षणानुसार सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमरता असल्यास एकरी 10 किलो फेरस सल्फेट, 8 किलो झिंक सल्फेट, 4 किलो मॅगेनीज सल्फेट व दोन किलो बोरॅक्स ही सुक्ष्म अन्नद्रव्येयुक्त खते 1:10 प्रमाणात सेंद्रिय खतांमध्ये मिसळून 4 ते 5 दिवस सावलीत मुरवून वापरावीत. ऊस पिकाचा खोडवा आर्थकिदृष्ट्‌‍या फायदेशीर असेल, तर पुढील खोडवे ठेवण्यात यावेत, असेही त्यांनी साखर आयुक्तालयास कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here