पुणे : माळेगाव, सोमेश्वर व छत्रपती हे तिन्ही सहकारी साखर कारखाने सध्या चांगले सुरू आहेत. मी रोज गाळपाचीही माहिती घेत आहे. परंतु, माळेगाव कारखान्यात काही अति उत्साही संचालक अधिकाऱ्यांना धारेवर धरत आहेत. अधिकारी हे आपले सालगडी नाहीत, हे त्यांनी ध्यानात घ्यावे, असा सज्जड इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत दिला. उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, तिन्ही कारखान्यांतील दरात यंदा कमी तफावत राहील. माळेगाव साखर उताऱ्यात पुढे होता. परंतु सोमेश्वरने माळेगावला गाठले. काही हरकत नाही. स्पर्धा चांगली व निकोप असावी. छत्रपतीचेसुद्धा आठ हजारांनी रोजचे गाळप होत आहे. माळेगाव साडेनऊ, तर सोमेश्वर दहा हजारांनी गाळप करत आहे. या तिन्ही कारखान्यांच्या इन्कम टॅक्समधून मी मार्ग काढला, असेही त्यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, चांगला कन्स्लटंट देत माळेगावचे तीन-साडेतीन कोटी रुपये परत मिळविले. सभासदांनी ज्या उद्देशाने आम्हाला खुर्चीवर बसवले तसे बारकाईने काम करत आहे. असे असताना काही अति उत्साही संचालक अधिकाऱ्यांना धारेवर धरत आहेत. काही जीव ओतून काम करत आहेत. अन्य ठिकाणीसुद्धा असे प्रकार सुरू आहेत. यासंबंधी मी बैठक घेणार आहे. कारखान्याचे अधिकारी हे काही आपले सालगडी नाहीत. ते चुकले तर चेअरमन म्हणून मला सांगा. मी बघेन, आज राज्यात खासगी व सहकारी २००च्या वर कारखाने झाले आहेत. थोडे काही झाले की अधिकारी दुसरीकडे जातात. त्यामुळे तिन्ही कारखान्यातील पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की आपल्याला चांगले रिझल्ट द्यायचे आहेत. त्यात डावे-उजवे करू नका. काही अडचणी निर्माण होतात. पण त्यातून मार्ग काढू, शेजारील अनेक कारखान्यांनी गाळप क्षमता प्रचंड वाढवली आहे. पण आपल्या कारखान्यांवर उत्पादकांचा विश्वास असल्याने आणि चांगल्या दराची परंपरा असल्याने शेतकरी इतरत्र ऊस देत नसल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.
पुढच्या वेळेत गड्याच्या डोक्यात आमदारकी दिसतेय…
या मेळाव्यात माळेगावचे संचालक योगेश जगताप यांना पणदरे गटातून जिल्हा परिषदेला संधी द्यावी असे निवेदन पवार यांना दिले गेले. पवार यांनी ते वाचून कारखान्यात समाधानी नाही का? असा सवाल केला. तुम्हाला नगराध्यक्ष केले, कारखान्यात घेतले, आता जिल्हा परिषद मागताय, पुढच्या वेळेत गड्याच्या डोक्यात आमदारकी दिसतेय. गाडी टप्प्या-टप्प्याने पुढे चाललीय, आता काय बोलायचं, असे पवार म्हणाले.

















