एलपीजीला पर्याय म्हणून इथेनॉल वापरण्याचे साखर महासंघ, इथेनॉल उत्पादक संघटनेचे केंद्र सरकारला आवाहन

पुणे : सध्याच्या जागतिक परिस्थितीत आणि ‘एलपीजी’वरील वाढते आयात अवलंबित्व पाहता देशात स्वयंपाकासाठी ‘इथेनॉल’चा पर्याय म्हणून वापर वाढविण्यासाठी स्वतंत्र धोरण तयार करावे, अशी मागणी साखर कारखाना महासंघाने पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाकडे केली आहे. ‘इथेनॉल’चा स्वच्छ इंधन म्हणून वापर केल्यास ‘एलपीजी’वरील अवलंबित्व कमी होण्यासह साखर उद्योगालाही मोठा दिलासा मिळू शकतो, असे महासंघाने म्हटले आहे. देशात ‘इथेनॉल’ आधारित ‘स्टोव्ह’ना प्राधान्य द्यावे, अशी मागणी जोर धरत आहे. यासंदर्भात केंद्र सरकारला राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ, धान्याधारित इथेनॉल उत्पादक संघटना (ग्रेन इथेनॉल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन जीईएमए) यांनी निवेदने दिली आहेत.

‘जीईएमए’ संघटनेचे अध्यक्ष सी. के. जैन यांनी यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विविध केंद्रीय विभागांच्या मंत्र्यांना पत्र लिहिले आहे. प्रायोगिक तत्त्वावर घरगुती आणि व्यावसायिक वापरासाठी ‘इथेनॉलवर चालणारे ‘स्टोव्ह’ वापरण्यासाठी उत्तेजन द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. तर भारताने ‘इथेनॉल मिश्रित पेट्रोल कार्यक्रमांतर्गत मोठी प्रगती केली असून देशात साखर कारखाने तसेच न्याधारित डिस्टिलरींमुळे मोठ्या प्रमाणावर ‘इथेनॉल ‘ उत्पादन क्षमता उपलब्ध आहे. इथेनॉलचा स्वयंपाकासाठी वापर केल्यास देशांतर्गत बाजारपेठ निर्माण होईल आणि आयातीवरील खर्च कमी होईल, असे महासंघाने म्हटले आहे. याबाबत महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांना पत्र पाठवले आहे. सध्या जागतिक पातळीवरील तणावपूर्ण परिस्थितीमुळे ऊर्जा पुरवठा साखळीवर परिणाम होत असून काही भागात ‘एलपीजी’ उपलब्धतेवर मर्यादा येत आहेत. भारत मोठ्या प्रमाणावर ‘एलपीजी’ आयात करतो, त्यामुळे पर्यायी स्वच्छ इंधनाचा विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here