साखर उद्योगाला इराण-इस्राइल युद्धाचा मोठा फटका; साखरेची निर्यात ठप्प

पुणे : अमेरिका – इस्राईल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे जागतिक बाजारपेठ ढवळून निघाली आहे. त्याचा मोठा फटका साखर उद्योगाला बसला आहे. आधीच रडतखडत सुरू असलेली साखर निर्यात वाहतुकीतील अडथळ्यांमुळे जवळपास ठप्प झाली आहे. यामुळे देशांतर्गत बाजारात तब्बल १५ लाख टन साखरेचा अतिरिक्त साठा शिल्लक राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे. केंद्र सरकारे यावर्षी निर्यात कोटा वाढवून २० लाख टन केला असला तरी निर्यातीत युद्धामुळे मोठी घट होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. दैनिक ‘सकाळ’शी बोलताना इंडियन फेडरेशन ऑफ ग्रीन एनर्जीचे सहअध्यक्ष दिलीप पाटील आणि ‘विस्मा’चे कार्यकारी संचालक अजित चौगुले यांनी जागतिक स्तरावर सुरू असलेल्या युद्धांचा परिणाम साखर उद्योगावरही होणार असून साखरेच्या निर्यातीवर अधिक परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली.

यापूर्वी देशात साखरेचा वार्षिक खप सुमारे ३०० लाख टनांच्या आसपास होता. यावर्षातील पहिल्या सहा महिन्यांतील विक्रीचा कल पाहता या वर्षी साखरेचा एकूण खप २७० लाख टनांच्या आसपास राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सहा महिन्यांच्या कालावधीत सुमारे १३३ लाख टन साखर विक्री झाली आहे. यंदा देशभरात सुमारे २९५ ते ३०० लाख टन साखरेचे उत्पादन होण्याचा अंदाज आहे. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचा दर सुमारे ३,६०० ते ३,७०० रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे. गेल्यावर्षी हा दर ४,५०० रुपयांपर्यंत गेला होता. त्यावेळी सरकारने १० लाख टन साखर निर्यातीचा कोटा दिला तरी फक्त आठ लाख टन साखर निर्यात झाली. यंदा २० लाख टन निर्यातीस परवानगी दिली गेली असली तरी आतापर्यंत फक्त ४ लाख टन साखरेची प्रत्यक्ष निर्यात झाली आहे. करारांमुळे अपेक्षित निर्यात ५ लाख टन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे देशांतर्गत बाजारात १५ लाख टन साखर अतिरिक्त राहू शकते, असे साखर उद्योगातील सूत्रांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here