सातारा : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याने सन २०२४-२५ च्या गाळपास उसाला ३२०० रुपये दर दिला. तसेच अधिकचे प्रति टनास १११ रुपये देऊन शेतकऱ्यांसाठी चांगला निर्णय घेतला. एकूण दर प्रति टन ३३११ दिला. त्याबद्दल कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांचा रयत क्रांती संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. दरम्यान, सातारा जिल्ह्यातील अन्य साखर कारखानदारांनी य. मो. कृष्णा सह. साखर कारखान्याचा आदर्श घ्यावा, असे प्रतिपादन रयत क्रांती संघटनेचे तालुका अध्यक्ष अशोक लोहार यांनी केले.
लोहार म्हणाले, सातारा जिल्ह्यातील इतर साखर कारखान्यांनी य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचा आदर्श घेऊन दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना एफआरपी अधिक ज्यादा पैसे देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी. शेतकरी अडचणीत आहेत. याचा विचार करून कारखानदारांनी सकारात्मक निर्णय घ्यावा. यावेळी राज्य प्रवक्ते लालासाहेब पाटील, पेठ वाहतूक संघटना अध्यक्ष बजरंग भोसले, अध्यक्ष संदीप फारणे, आनंद सावंत राजाराम रसाळ तसेच वाळवा तालुक्यातील रयत क्रांती संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.