हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.
कोल्हापूर : चीनी मंडी
यंदाच्या गळीत हंगामात कोल्हापूर विभागातील साखर कारखान्यांकडे १३१२ कोटी रुपयांची एफआरपी थकीत आहे. त्याची पुर्तता करण्यासाठी विभागातील ३८ पैकी ३२ साखर कारखान्यांनी साखर आयुक्तांकडे केंद्र शासनाच्या योजनेतील सॉफ्ट लोन मिळविण्यासाठी प्रस्ताव दाखल केले आहेत. साखर आयुक्तांकडून यासंबंधीची प्रक्रिया सुरू असून येत्या पंधरा दिवसांत एफआरपी शेतकऱ्यांना मिळेल अशी शक्यता आहे.
सध्या कोल्हापूर जिल्ह्यात तीन साखर कारखान्यांचा हंगाम सुरू आहे. उर्वरीत १६ साखर कारखाने बंद झाले आहेत. एफआरपी एकरकमी देणे शक्य नसल्याने बहुतांश सर्व साखर कारखान्यांनी पहिल्या टप्प्यात शेतकऱ्यांना २३०० रुपये अदा केले. तर सरसेनापती घोरपडे कारखाना कापशी, दालमिया कारखाना आसुर्ले-पोर्ले, जवाहर कारखाना हुपरी, दत्त कारखाना शिरोळ आणि गुरुदत्त कारखाना टाकळी या पाच कारखान्यांनी पूर्ण एफआरपी दिली आहे.
आतापर्यंत मार्च अखेरीस कोल्हापूर आणि सांगली या दोन्ही जिल्ह्यांतील सर्व साखर कारखान्यांकडून ४५८४ कोटी रुपये एफआरपीपोटी शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत. आतापर्यंत झालेल्या गाळपानुसार मार्च अखेर एकूण ५८९७ कोटी रुपये एफआरपीची रक्कम होते.
थकीत सुमारे १३१२ कोटी रुपयांच्या एफआरपीसाठी कारखान्यांनी सॉफ्ट लोनसाठीच्या हालचाली सुरू केल्या आहेत. केंद्र सरकारने साखर कारखान्यांना एफआरपी देणे सोपे जावे यासाठी साखर विक्रीचा दर २९०० रुपयांवरून २०० रुपयांनी वाढवून तो ३१०० रुपये प्रतिक्विंटल केला. तरीही एफआरपी देण्यास प्रतिटन ५०० रुपये कमी पडत असल्याचा दावा कारखानदारांचा आहे.
देशांतर्गत बाजारात साखरेचा दर वाढेल अशी शक्यता सद्यस्थितीत नसल्याचे साखर कारखानदारांचे म्हणणे आहे. त्यामुळे साखरेवर ३१०० रुपये यानुसार कर्ज उपलब्ध होणार आहे. हे कर्ज पाच वर्षांसाठी पाच टक्के व्याजदराने असेल. त्यासाठीचे प्रस्ताव साखर आयुक्तांकडे सादर झाले आहेत. त्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचे साखर आयुक्त कार्यालयातील सूत्रांनी सांगितले.
डाउनलोड करा चीनीमंडी न्यूज ॲप: http://bit.ly/ChiniMandiApp


















