बेळगाव : महाराष्ट्रातील साखर कारखानदारांची रिकव्हरी अधिक आहे. पण कर्नाटकातील साखर कारखानदार कमी रिकव्हरी दाखवून शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक करीत आहेत. साखरमंत्र्यांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. एक टनापासून ७ हजार मिळविणारे कारखानदार शेतकऱ्यांना केवळ ३ हजार रुपये देऊन उपकाराची भाषा करत आहेत, असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खा. राजू शेट्टी यांनी केले. बोरगाव येथे स्वाभिमानी शेतकरी संघटना व कर्नाटक राज्य रयत संघटनेतर्फे आयोजित ऊस परिषदेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अण्णासो पवार होते.
शेट्टी म्हणाले, जागतिक बाजारात साखर, इथेनॉलला मोठी मागणी आहे. उसापासून वीज गॅस व इतर उत्पादने बनविण्यात येत आहेत. पण शेतकऱ्यांच्या उसाला दर देणे शक्य होत नाही. ऊस वाहतूकदार, ऊस तोडणारे, कारखानदार, पतसंस्था धारक शेतकऱ्यांना लुटत आहेत. त्यासाठी शेतकरी जागा झाला पाहिजे. शेतकऱ्यांनी ऊस देण्यास गडबड करू नये. दरासाठी यंदा कर्नाटकात आंदोलनाचा धुरळा उडणार आहे.
कर्नाटका रयत संघाचे अध्यक्ष गणेश इळीगार यांनी, साखर मंत्री शिवानंद पाटील यांनी शेतकऱ्यांना फसवले आहे. उसाला योग्य भाव व एफआरपीप्रमाणे दर देण्याचे खोटे आश्वासन देत आहेत. आपण लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.