पुणे : गेल्यावर्षी, गळीत हंगामाच्या सुरुवातीपासून ऑक्टोबर २०२१ पासून साखर उद्योगातील मनुष्यबळ, कच्चा माल, माल वाहतुकीमधील इंधनाचे दर या सर्व गोष्टींच्या किमती वाढल्या. मात्र, साखरेची एमएसपी वाढलेली नाही. ही स्थिती दीर्घकाळ चालणार नाही. वाढता उत्पादन खर्च लक्षात घेऊन साखरेची एमएसपी वाढविण्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन श्री रेणुका शुगर्सचे संचालक रवि गुप्ता यांनी केले.
राज्य साखर संघाच्यावतीने मांजरी येथे आयोजित राज्यस्तरीय ऊस परिषदेत साखर उद्योगाने मार्जिन कसे इम्प्रुव्ह करावे या विषयी मार्गदर्शन करताना संचालक रवि गुप्ता म्हणाले की, ऑक्टोबरपासून सर्व गोष्टींच्या किमती वाढल्या आहेत. मात्र देशांतर्गत बाजारपेठेत साखरेचा दर घसरला आहे. ऑक्टोबर २०२१ मध्ये साखरेचा दर ३४ रुपये होता. आता महाराष्ट्रात कारखान्यांसमोर ३२.५० रुपये दर आहे. कारखान्यांना द्यावी लागणारी एफआरपी, साखर उत्पादनासाठी येणारा खर्च, कारखान्यांचा परतावा या सर्व बाबींवर आधारीत एमएसपी हवी. साखरेची किंमत वास्तवदर्शी स्थितीवर ठरवायला हवी. देशातील साखर उत्पादनातील वाढ आगामी काही वर्षे टिकून राहिल. त्यामुळे उद्योगाने रिफाइंड शुगरच्या उत्पादनावर भर दिला पाहिजे. याशिवाय कारखान्यांनी साखर निर्यातीवर अधिक भर देत आंतरराष्ट्रीय बाजाराशी थेट कनेक्ट राहिले पाहिजे. ब्रँडेड मार्केटमध्येही उतरण्याचा विचार करावा असे गुप्ता म्हणाले.
यासोबतच गुप्ता म्हणाले की, ब्रॅंडेड साखरेची मागणी देशभरात सातत्याने वाढत आहे. त्यामुळे साखर कारखान्यांनी आपला स्वतःचा ब्रॅंड तयार करण्याची गरज आहे. ब्रॅंडेड साखरेचे मार्केट आपण सोडता कामा नये. जे साखर कारखाने या क्षेत्रात येऊ इच्छितात, त्यांनी यादृष्टीने विचार करावा. मात्र आपला ब्रॅंड तयार करण्यासाठी वेळ, धैर्य आणि गुंतवणूक करण्याची तयारी दाखवली पाहिजे. जर तुम्ही स्वतःचा ब्रॅंड तयार करू शकत नसाल तर मोठ्या ब्रॅंडच्या customized manufacturing वर काम करू शकता. आणि सप्लाय टू इन्स्टिट्यूशनसोबत काम करून आपले रेवेन्यू वाढवू शकतो.
गुप्ता यांनी सांगितले की, देशात यंदा एकूण साखर उत्पादन ३९५ लाख टन असेल. यातील ३४ लाख टन साखर इथेनॉलकडे वळवली आहे. त्यामुळे देशात साधारणतः ३६० लाख टन साखर उत्पादित होईल. आमचा वापर साधारणतः २७५ लाख टन आहे. त्यामुळे सध्या साखर सरप्लस आहे. पुढील तीन ते चार वर्षे साखर उत्पादनाची स्थिती अशीच राहील. त्यामुळे आता आपल्याला स्पर्धेला तोंड द्यायचे आहे. क्रुडचा वाढलेला दर, ब्राझीलने इथेनॉलकडे वळवलेली साखर, भारतातील साखरेचा दर यामुळे साखर उद्योगासाठी चांगली स्थिती आहे. रुपया घसरल्याचाही निर्यातीला फायदा होत आहे. यामुळे कारखान्यांनी मार्निन वाढविण्यासाठी रिफाइंड शुगर प्रॉडक्शनकडे लक्ष द्यायला हवे. आपली रिफायनरी तशा गोष्टीमध्ये परावर्तीत करायला हवी. वार्षिक ५००० टनाचा प्लांट असेल आणि ५०० टन साखर उत्पादीत होत असेल तर ती जर जर रिफाईंड बनवली तर त्यापासून साधारणतः ९ ते १० कोटींचे जादाचे उत्पादन मिळते. शिवाय आपण साखर निर्यात हा नेहमीचाच भाग मानयला हवा. को-ऑपरेटिव्ह साखर कारखान्यांनी मध्यस्त टाळून थेट आंतरराष्ट्रीय बाजारात उतरता येईल का हे पाहावे. सध्याची बाजाराची गरज ब्रँडेड शुगरची आहे. याचा फायदा घ्यायला हवा. ई कॉमर्स साईट, तरुण वर्ग ब्रँडेड शुगरकडे वळला आहे. आपणही याकडे लक्ष द्यावे, असे गुप्ता म्हणाले.