साखरेची MSP प्रति क्विंटल 4200 रुपये करावी : ‘विस्मा’ची केंद्र सरकारकडे मागणी

केंद्र शासनाने गाळप हंगाम 2025- 26 साठी उसाची एफआरपी प्रति टन 150 रुपये वाढवून आता 3550 रुपये केली, ही अत्यंत स्वागतार्ह बाब असल्याचे ‘विस्मा’ने म्हटले आहे. मात्र त्याचबरोबर केंद्र सरकारने आता साखरेची एमएसपी सुद्धा वाढवणे आवश्यक असल्याचे ‘विस्मा’ ने म्हटले आहे. केंद्रीय कृषी मूल्य आयोगाच्या शिफारशीवरून केंद्र सरकार उसाची एफआरपी वाढवते, त्या केंद्रीय कृषी मूल्य आयोगाने प्रत्येक वर्षीच्या आपल्या रिपोर्टमध्ये एफआरपी वाढवत असताना त्या प्रमाणामध्ये साखरेची एमएसपीसुद्धा वाढवणे आवश्यक असल्याचे नमूद केलेले आहे. मात्र केंद्र सरकार ‘एफआरपी’चा निर्णय घेताना ‘एमएसपी’कडे दुर्लक्ष करते. त्यामुळे साखर कारखाने प्रचंड आर्थिक संकटात आलेले आहेत, असा दावा ‘विस्मा’ने केला आहे.

‘विस्मा’ने म्हटले आहे कि, एफआरपी गेल्या सहा वर्षात दरवर्षी वाढवली गेली, मात्र गेल्या सहा वर्षात साखरेची एमएसपी म्हणजे किमान आधारभूत किंमत एकदाही वाढवली नाही. ज्यावेळेस उसाची एफआरपी 2750 रुपये प्रति टन होती, त्यावेळेस साखरेची एमएसपी प्रति क्विंटल 2900 रुपये होती. त्यानंतर फक्त एक वेळेस एमएसपीमध्ये वाढ करून 3100 रुपये प्रति क्विंटल करण्यात आली. त्यानंतर 2019 पासून एमएसपीमध्ये वाढ झालेली नाही. सध्यादेखील साखरेची एमएसपी 3100 आहे व उसाची एफआरपी मात्र आता 3550 रुपये झालेली आहे. त्यामुळे प्रत्येक वर्षी या एफआरपीप्रमाणे उसाची किंमत देण्यासाठी साखर कारखान्यांना मोठ्या प्रमाणात कर्ज घ्यावे लागते. त्यामुळे साखर कारखान्यांवरील कर्जाचा डोंगर दरवर्षी वाढतो आहे व संचित तोट्याचे प्रमाण प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढले आहे.

‘विस्मा’च्यावतीने केंद्र सरकारला विनंती करण्यात आली आहे कि, कृषी मूल्य आयोगाने शिफारस केल्याप्रमाणे एफआरपी ज्या प्रमाणात वाढवली जाते, त्या प्रमाणात एमएसपी वाढ करण्यात यावी. आज गेल्या सहा वर्षातील एमएसपी वाढीतील फरक व आज प्रती क्विंटलचा उत्पादन खर्च लक्षात घेता आज साखरेची एमएसपी किमान 4200 रुपये प्रति क्विंटल होणे अपेक्षित आहे. तसेच सध्या थेट उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मितीमुळे साधारण प्रत्येक साखर कारखान्यात उसाचा वापर 25% पर्यंत इथेनॉल निर्मितीकडे वळलेला आहे. त्यामुळे इथेनॉलची किंमत ही एफआरपी किमतीच्या वाढीशी निगडित करून देणे आवश्यक आहे. त्यासाठी आज 60 रुपये प्रति लिटर असणारी बी मोलासेसपासूनच्या इथेनॉल ची किंमत किमान 70 रुपये प्रति लिटर होणे आवश्यक आहे. तरच साखर कारखान्याचा प्रति लिटर इथेनॉलचा उत्पादन खर्च निघेल. ‘विस्मा’च्यावतीने केंद्र सरकारकडे साखरेची एमएसपी 4200 रुपये प्रति क्विंटल व इथेनालची किंमत 70 रुपये प्रति लिटर करण्यात आल्याची माहिती ‘विस्मा’चे अध्यक्ष बी.बी. ठोंबरे यांनी ‘चीनी मंडी’शी बोलताना दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here