पुणे : राज्यातील गाळप हंगाम १ नोव्हेंबरपासून सुरु करण्याचा निर्णय मंगळवारी मंत्री समितीच्या बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार यंदाच्या २०२५-२६ हंगामामध्ये इथेनॉलकडे सुमारे २० लाख मे. टन साखर जाणार असून, प्रत्यक्षात साखरेचे उत्पादन हे ८५ ते ९६ लाख मेट्रिक टनाच्या आसपास राहण्याचा संयुक्त अंदाज कृषी विभाग आणि मिटकॉनतर्फे वर्तविण्यात आला आहे. दैनिक ‘पुढारी’ने याबाबतचे वृत्त दिले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (दि. ३०) मंत्रालयात मंत्री समितीची बैठक झाली. त्यामध्ये प्रभारी साखर आयुक्त दीपक तावरे यांनी साखर उद्योगाचे सादरीकरण केले. त्यामध्ये चालू वर्षी एकूण ऊस उपलब्धता, होणारे ऊस गाळप, साखर उत्पादन, सरासरी साखर उतारा याबाबत माहिती देण्यात आली.
राज्यात अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरात शेती, फळबागांचे अतोनात नुकसान झाले असून जमीनही खरडून जाण्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. ऊस गाळप हंगाम सुरू करण्यास आता एक महिन्याचा अवधी आहे. त्यामुळे प्रत्यक्षात दिवाळीनंतरच ऊस गाळप सुरू होणार असल्याने ऊसतोड मजुरांची उपस्थितीही हंगामाच्या सुरुवातीपासून सुरू राहण्याची अपेक्षा आहे. हंगाम २०२४-२५ मध्ये सरासरी ऊस गाळपाचे ८५ दिवस राहिले आहेत. यंदाच्या २०२५-२६ च्या हंगामातील उपलब्ध उसाची स्थिती तुलनात्मकदृष्ट्या अधिक असल्याने सरासरी १०० ते ११० दिवस हंगाम राहण्याची अपेक्षा वर्तविण्यात येत आहे.
गतवर्षी राज्यात २०० साखर कारखान्यांनी ऊस गाळप केले होते. यंदा आजअखेर प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयस्तरावर १०४ सहकारी आणि १०७ खासगी मिळून एकूण २११ साखर कारखान्यांनी ऊस गाळप परवाने मिळविण्यासाठी प्रस्ताव सादर केले आहेत. म्हणजेच गतवर्षपिक्षा यंदा अधिक कारखाने सुरू होण्याची अपेक्षा आहे. गाळप हंगामाचे धोरण निश्चितीनुसार योग्य त्या रकमा भरल्यानंतर आणि छाननीत परिपूर्ण प्रस्ताव असलेल्या साखर कारखान्यांना गाळप परवाने वितरित करण्यात येतील, असे साखर आयुक्त दीपक तावरे यांनी सांगितले आहे.