कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात ऊस आंदोलनाचा भडका उडला असून शिरोळ तालुक्यात आंदोलन उग्र स्वरूप धारण करत आहे. कोल्हापूर-सांगली महामार्गावरील निमशिरगाव (ता. शिरोळ) जवळ ऊस वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टर अज्ञात लोकानी पेटवून दिली. यात वाहनांचे मोठे नुकसान झाले असून, शेतकरी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मंगळवारी (ता. २८) रात्री साडेनऊच्या सुमारास हा प्रकार घडला. घटनेनंतर आंदोलक घटनास्थळावरून पसार झाले.
शिरोळ तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून ऊसदरासाठी विविध मार्गांनी आंदोलने सुरू आहेत. दैनिक ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, जिल्ह्यात कारखान्यांकडून उसाची पळवापळवी टाळण्यासाठी कारखान्यांनी मुदतीपूर्वीच कारखाने सुरू करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. संघटनांनी केलेल्या दराच्या मागणीवर कारखानदारांकडून सकारात्मक भूमिका घेतली जात नसल्याची भावना आंदोलकांमध्ये आहे. कारखानदारांकडून केवळ एफआरपीची रक्कम जाहीर केली जात असल्याने शिवाय गत हंगामातील जादाची विले देण्याबाबत कारखानदारांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने आंदोलन उग्र स्वरूप धारण करत आहे.
मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास उसाची वाहतूक करणाऱ्या तीन वाहनांना अडवून अनोळखींनी पेटवून दिली. आगीचा भडका उडाल्यानंतर वाहने पेटवून दिल्याचे मार्गावरून जाणाऱ्यांच्या लक्षात आले. तातडीने पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिस तत्काळ घटनास्थळी पोहोचले. मात्र, तोपर्यंत आंदोलक घटनास्थळावरून पसार झाले होते. चार दिवसांत हंगाम गतिमान होणार आहे. मात्र, जिल्हा प्रशासनाने अद्याप ऊसदराच्या प्रश्नात मध्यस्थीची भूमिका घेतली नसल्याने आंदोलक आणि कारखानदारांमध्ये चर्चेला सुरुवात झालेली नाही. यामुळे आंदोलनाचा भडका उडण्याची शक्यता निर्माण झाली असून, जिल्ह्यात ठिकठिकाणी ऊस वाहतूक रोखणे, कारखान्यासमोर आंदोलन करणे, वाहने पेटवून देणे, अशा स्वरूपाची आंदोलने सुरू आहेत.
कोथळी, जैनापूर येथे ऊस वाहतूक रोखली…
‘आंदोलन अंकुश’ने चिपरी (ता. शिरोळ) येथील यड्रावकर इंडस्ट्रीजकडे होणारी ऊस वाहतूक मंगळवारी (ता. २८) रोखली. सलग दुसऱ्या दिवशी “आंदोलन अंकुश “च्या पदाधिकाऱ्यांनी यड्रावकर इंडस्ट्रीजविरोधात आंदोलन सुरू ठेवले. कोथळी आणि जैनापूर येथील ऊस वाहतूक रोखून वाहने परत पाठविली. ‘आंदोलन अंकुश’च्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी दिवसभर चिपरी येथील यड्रावकर इंडस्ट्रीजच्या प्रवेशद्वारात आंदोलन करून प्रकल्प बंद ठेवण्यास भाग पाडले होते. दिवसभर पोलिस अधिकाऱ्यांनी प्रकल्प व्यवस्थापन आणि आंदोलकांमध्ये चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, रात्री उशिरापर्यंत चर्चा झाली नसल्याने पदाधिकाऱ्यांनी आंदोलन सुरूच ठेवले होते. अखेर पोलिसांनी पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेऊन आंदोलन मागे घेण्यास भाग पाडले. जयसिंगपूर पोलिस ठाण्यात रात्री उशिरा आंदोलकांना नोटिसा देऊन मुक्त करण्यात आले होते. यानंतर कमी दर देऊन गाळपास सुरुवात केल्याबद्दल प्रकल्प व्यवस्थापना विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी आंदोलकांनी ठिय्या मारला होता.
चिपरी (ता. शिरोळ) येथील खांडसरीकडे जाणारी ऊस वाहतूक स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी तमदलगे येथे रोखली. ऊसदरप्रश्नी स्वाभिमानीने आंदोलनाचे रणशिंग फुंकले आहे. पहिली उचल ३७५१ रुपये मिळावी, मागील हंगामातील दोनशे रुपये द्यावेत, अशी ‘स्वाभिमानी’ची मागणी आहे. खांडसरीने यावर्षी केवळ ३३०० रुपये दर जाहीर केला आहे. तो आम्हाला मान्य नाही, अशी भूमिका घेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष सचिन शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली कार्यकर्त्यांनी तमदलगे वेथे ऊस वाहतूक करणारी वाहने अडवून ती परत पाठविली. यावेळी महेंद्र जगदाळे, उत्तम माळी, प्रदीप चव्हाण, बाळासाहेब देशमुख, सचिन सूर्यवंशी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.












