सांगली : पाण्याची उपलब्धता आणि साखर कारखान्यांकडून मिळालेला चांगला दर यामुळे यावर्षी ऊसाच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. त्यामुळे खरीप पेरणीचे क्षेत्र सुमारे दोन हजार हेक्टरने घटण्याची शक्यता आहे. तर यंदाच्या हंगामात मक्याचे क्षेत्र विक्रमी होणार असल्याचा कृषि विभागाचा अंदाज आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नुकतीच खरीप हंगामाची पूर्व तयारी आढावा बैठक घेतली. यावेळी खते बियाणांचा पुरवठा, दर्जा आणि दरावरही लक्ष ठेवण्याच्या सूचना त्यांनी कृषि विभागाला दिल्या आहेत. यावेळी २७ ते २८ मे नंतर जुलै महिन्यातच पाऊस होण्याची शक्यता आहे.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुमार यांनी सांगितले की, खरीप हंगामात शेतकऱ्याना खते आणि वियागे कमी पडणार नाहीत याची दक्षता कृषि विभागाने घेतली आहे. सुमारे दोन लाख ९५ हजार हेक्टरवर खरीपाचा पेरा होण्याची शक्यता आहे. ही गृहीत धरून कृषी विभागाने खते आणि बियाणांची मागणी केली आहे. गेल्या वर्षभरात मक्याचा प्रतिक्विंटल दर २२०० ते २३०० रुपये टिकून आहे. याशिवाय ग्रामीण भागात दुग्धव्यवसाय आणि पशुपालन व्यवसाय वाढल्याने मक्याच्या मुरघासाला मागणी वाढली आहे. दरम्यान, ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू योजनांच्या आवर्तनामुळे दुष्काळी भागात फिरलेले पाणी आणि साखर कारखान्याकडून मिळालेला चांगला दर यामुळे ऊस पिकाची लागवड अधिक क्षेत्रात होईल असा अंदाज आहे. त्यापाठोपाठ मक्का पिकाचा समावेश आहे. त्याचा सर्वाधिक फटका ज्वारी पिकाला बसल्याचे दिसून येते. पाच वर्षापूर्वी सरासरी ४९ हजार हेक्टरवर होणारी खरीप ज्वारीची पेरणी यावर्षी जेमतेम दहा हजार हेक्टरपर्यंत होण्याची शक्यता आहे.