कोल्हापूर : जयसिंगपूर येथील विक्रमसिंह क्रीडांगणावर येत्या मंगळवारी, ७ नोव्हेंबर रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची २२ वी ऊस परिषद होणार आहे. गतवर्षी तुटलेल्या उसाचे ४०० रुपये आणि यंदा गाळप होणाऱ्या उसाची पहिली उचल किती घ्यायची, याची घोषणा ऊस परिषदेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी जाहीर करणार आहेत. या ऊस परिषदेची जय्यत तयारी सुरू आहे. दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातील काही साखर कारखान्यांनी कारखाने सुरू करण्याबाबत हालचाली गतिमान केल्या आहेत.
गेल्यावर्षीच्या उसाचे ४०० रुपये आणि भविष्यात गाळप होणाऱ्या उसाची विनाकपात पहिली उचल याबाबत निर्णय झाल्याशिवाय कोणत्याही कारखान्याला ऊस पुरवठा होऊ देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिला. ते म्हणाले की, ऊस दराचा निर्णय झाला नसताना कारखानदारांनी कारखाने सुरू करण्याबाबत आपल्या बगलबच्च्यांना हाताशी धरून हालचाली चालू केल्या आहेत; परंतु आम्ही ते होऊ देणार नाही. यावेळी ‘स्वाभिमानी’चे नेते सावकार मादनाईक, विठ्ठलराव मोरे, सुभाष शेट्टी, शैलेश आडके, राम शिंदे, सागर शंभूशेचे, आप्पा एडके, सागर मादनाईक, जनार्दन पाटील उपस्थित होते.












