छत्रपती संभाजीनगर : विभागातील छत्रपती संभाजीनगर जालना व बीड या तीन जिल्ह्यांसह जळगाव व नंदुरबार मिळून पाच जिल्ह्यातील २३ कारखान्यांनी आत्तापर्यंत ऊस गाळपात सहभाग घेतला आहे. आणखी एक कारखाना सुरू होण्याची शक्यता असून ऊस गाळपाने गती घेतली आहे. सद्यस्थितीत राज्यातील सुमारे एक हजारावर हार्वेस्टरच्या साह्याने उसाची काढणी सुरू आहे. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या तीन जिल्ह्यांत सुमारे ७० पेक्षा जास्त ऊस हार्वेस्टर कार्यरत आहेत. साखर विभागाच्या सूत्रांनी सांगितले की, छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या तीनही जिल्ह्यांतील जवळपास सर्व कारखाने आत्ताच्या घडीला पूर्ण क्षमतेने ऊस गाळप करीत असल्याचे दिसत आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तीन सहकारी व पाच खासगी मिळून आठ कारखान्यांनी १२ लाख १३ हजार ७५१ टन उसाचे गाळप केले. या आठही कारखान्यांचा सरासरी साखर उतारा ८.५९ टक्के राहिला. देवगिरी कारखाना जानेवारीत सुरू होण्याची शक्यता आहे. जालना जिल्ह्यातील तीन सहकारी व दोन खासगी मिळून पाच कारखान्यांनी आतापर्यंत १० लाख ३४ हजार १८८ टन उसाचे गाळप केले. बीड जिल्ह्यातील सहा सहकारी व दोन खासगी मिळून आठ कारखान्यांनी १६ लाख ७६ हजार ३५८ टन उसाचे गाळप केले. या कारखान्यांचा सरासरी गाळप उतारा ६.५९ टक्के राहिला आहे. तर नंदुरबार जिल्ह्यातील एका कारखान्याने आत्तापर्यंत ३ लाख ३१ हजार ६३० टन उसाचे गाळप करत १ लाख ९५ हजार ४०० क्विंटल साखरेचे उत्पादन केले. जळगाव जिल्ह्यातील एका कारखान्याने ७७ हजार ९४० टन उसाचे गाळप करत सुमारे ६३ हजार ८५० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे.

















