पुणे : राज्यातील साखर कारखाने कार्यक्षेत्राबाहेरून ऊस आणून वाहतुकीचा अवाढव्य खर्च शेतकऱ्यांच्या माथी मारत आहेत. हा प्रकार तत्काळ थांबवून २५ किलोमीटर अंतरासाठी तोडणी-वाहतुकीचा दर कमिशनसह ८२२ रुपये निश्चित करावा आणि अतिरिक्त वाहतूक खर्च संबंधित कारखान्यांकडूनच वसूल करावा, अशी मागणी राजू शेट्टी यांनी साखर आयुक्तांकडे केली आहे. कारखाने कार्यक्षेत्राबाहेरून ऊस आणत असल्याने वाहतूक खर्च वाढून शेतकरी भरडला जात आहे. बोगस अहवाल देऊन क्षमता वाढवणाऱ्या कारखान्यांकडून जादा खर्च वसूल करावा आणि २५ किमीसाठी तोडणी-वाहतुकीचा दर निश्चित करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
शेट्टी म्हणाले, अनेक कारखान्यांनी बोगस अहवाल सादर करून स्वतःची गाळप क्षमता वाढवून घेतली आहे. आता ते ४० ते ६० टक्के ऊस कार्यक्षेत्राबाहेरून आणत आहेत, ज्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांचे प्रतिटन मोठे नुकसान होत आहे. साखर आयुक्त कार्यालयाने वस्तुस्थिती न तपासता गाळप परवाने दिल्याने हा फटका बसला असून, यापुढे कोणत्याही कारखान्याची गाळप क्षमता वाढवण्यास परवानगी देऊ नये, असेही शेट्टी यांनी ठणकावून सांगितले.