पुणे : साखर उद्योगाचा दरवर्षीचा हंगाम कालावधी सरासरी १६० ते १८० दिवस राहतो. मात्र, ऊस गाळप हंगाम २०२४-२५ मध्ये साखर कारखाने सरासरी ८३ दिवस चालले. गेल्यावर्षी, २०२३- २४ च्या तुलनेत संपलेल्या हंगामात सुमारे २२२ लाख टनांनी ऊस गाळप कमी झाले. त्याचा विपरित परिणाम होऊन यंदाच्या हंगामात साखर उत्पादनात ३० लाख मेट्रिक टनांनी घट आली आहे. त्यामुळे साखर उद्योगाचे उत्पन्न १२ हजार कोटींनी कमी झालेले आहे. उपपदार्थांचा हिशोब धरल्यास उद्योगाला सुमारे १५ हजार कोटींचा फटका बसला अशी माहिती राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष पी. आर. पाटील यांनी दिली.
साखर आयुक्तालयाकडील माहितीनुसार, हंगाम २०२४-२५ मध्ये ८५३.९६ लाख मेट्रिक टन ऊस गाळप पूर्ण झाले. ते याआधीच्या वर्षीच्या हंगामात (२०२३-२४) १०७६ लाख मे. टन झाले होते. तर यंदा साखर उत्पादन ८०.९४ लाख मेट्रिक टन झाले. जे गतवर्षी ११०.४४ लाख मेट्रिक झाले होते. साखर उद्योगाकडून उपपदार्थांचेही मोठे उत्पादन होते. त्यामध्ये अल्कोहोल, इथेनॉल बगॅस आदींचाही समावेश आहे. या उत्पादनातही ऊसाच्या कमी गाळपामुळे मोठी घट झाली. त्यातून उद्योगास तीन हजार कोटी रुपये कमी मिळाले आहेत. म्हणजेच साखर कारखान्यांच्या गाळप क्षमतेचा पुरेपूर वापर झाला नाही, असे पाटील यांनी सांगितले.