सांगली : जिल्ह्यात गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून काही अंशी पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे सध्या जत, खानापूर, वाळवा, पलूस आणि कडेगाव या तालुक्यांतील शेतकऱ्यांनी ऊस लागवडी सुरू केल्या आहेत. जिल्ह्यात अधूनमधून हलका पाऊस पडत आहे. ऊस लागवडीला हळूहळू गती वाढू लागली असल्याचे चित्र आहे. सद्यःस्थितीला ७ हजार १७३ हेक्टरवर लागवड झाली आहे. यात जतमध्ये ७५ हेक्टर, खानापूरमध्ये २७८७ हेक्टर, वाळवा तालुक्यात २६६८ हेक्टर, पलूसमध्ये १४०७ हेक्टर, कडेगावमध्ये २३६ हेक्टर अशी ऊस लागवड झाली आहे.
जिल्ह्यात कृष्णा आणि वारणा नदीकाठच्या गावात मे महिन्यात आडसाली हंगामातील उसाची लागवड केली जाते. परंतु मे महिन्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यानंतर आठ दिवस पावसाने उघडीप दिली. त्यातच मेच्या शेवटच्या आठवड्यात पुन्हा पाऊस सुरू झाला. त्यामुळे शेतात पाणी साचून राहिले. त्यामुळे शेतीकामात अडथळे आले. त्यानंतर जून महिन्यातही पाऊस कोसळला. आता पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आडसाली हंगामातील ऊस लागवडीचे नियोजन केले आहे. वाळवा, मिरज तालुक्यांसह अन्य भागांत ऊस लागवडीची धांदल सुरू असल्याचे दिसते आहे.