पाटणा:बिहारमधील शेतकरी ऊस पिकवून आणि स्वतः गुळाचे उत्पादन करून स्वावलंबी होत आहेत. ‘जागरण’मध्ये प्रकाशित झालेल्या बातमीनुसार, ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखाने यांच्यातील मध्यस्थ शेतकऱ्यांचा नफा बळकावतात. मात्र भोजपूर जिल्ह्यातील नूरपूर गावातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी पारंपरिक प्रक्रियेला फाटा देत ऊस उत्पादनाबरोबरच गुळ उत्पादन सुरु करून स्वयंपूर्णतेचा मार्ग अवलंबला आहे. शेतकरी आणि ग्राहकांमध्ये कोणतेही मध्यस्थ नाहीत. गुळ विक्रीतून मिळणारा नफा थेट शेतकऱ्यांना मिळत आहेत. जिल्ह्यात कुठेही साखर कारखाना नाही, परंतु तरीही नूरपूर गाव ऊस लागवडीसाठी ओळखले जाते.
विशेष म्हणजे, गावातील अर्धा डझन शेतकरी एकत्रितपणे ऊस लागवड करतात आणि गुळाची विक्री करतात. गुळाच्या शुद्धतेमुळे आणि गुणवत्तेमुळे संपूर्ण जिल्ह्यातील लोक गुळ खरेदी करण्यासाठी येतात. ताज्या गुळाची खरेदी करण्यासाठी गर्दी असते. अगदी १०० रुपये प्रति किलो किमतीलाही गुळ विकला जातो. लोक विशेषतः येथे उपलब्ध असलेल्या गुळाच्या पावडरला साखरेचा पर्याय म्हणून घेतात.
प्रगतीशील शेतकरी धीरज सिंह हे गेल्या दोन वर्षांपासून नासरीगंज-सक्कडी मुख्य रस्त्यालगत असलेल्या त्यांच्या तीन एकर जमिनीवर ऊस लागवड करत आहेत. त्यांनी सांगितले की, त्यांनी समस्तीपूर राजेंद्र प्रसाद कृषी विद्यापीठात उन्नत ऊस लागवड आणि गूळ उत्पादन प्रक्रिया समजून घेण्यासाठी प्रशिक्षण घेतले. शेतकरी अजित कुमार यांच्या मते, उसाच्या लागवडीसाठी प्रति एकर अंदाजे १५०,००० रुपये खर्च येतो, तर प्रति हेक्टर अंदाजे १२ लाखाचे उत्पन्न मिळते.

















