बेळगाव/ कोल्हापूर : कर्नाटक सरकारने यंदाच्या गळीत हंगामात येणाऱ्या उसास ३३०० घोषणा केली आहे, परंतु नजीकच्या सांगली जिल्ह्यामध्ये ३४७० रुपये तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ३७१० रुपये प्रति टन दर घोषणा केल्याने सीमा भागातील ऊस सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात जाण्यास सज्ज आहे. सध्या दर पाहून दररोज शेकडो गाड्या सांगली जिल्ह्यातील कारखान्यास जात आहेत. दरात तफावत असल्याने शेतकरी स्थानिक कारखान्याला ऊस घालण्यास नाराज आहेत.
अथणी, कागवाड, जमखंडी, चिकोडी तालुका महाराष्ट्राच्या सीमेवर असल्याने सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याला या भागातील ऊस अधिक पुरवठा होणार आहे. शेतकरी जिकडे दर जास्त, तिकडे ऊस पाठवीत आहेत. सरकार ने ९.५ रिकव्हरी ला तीन हजार तीनशे रुपये व त्यापुढे प्रत्येक रिकव्हरीला शंभर रुपये असा आदेश दिल आहे. सरकारने कारखान्याच्या परिसरामध्ये मशीन व वजन काटा बसवावा, अशी मागणी आता शेतकरी संघटनेतून होत आहे.
शेतकरी संघटनेचे नेते, वकील एस. एस. पाटील म्हणाले, सरकारच्या आदेशाप्रमाणे ३३०० रुपये प्रति टन बिल एकाच वेळी शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करावे. सरकारने कारखान्याच्या परिसरामध्ये रिकव्हरी मशीन व वजन काटा बसवविला तरच शेतकऱ्यांना योग्य न्याय मिळू शकेल. कर्नाटक व महाराष्ट्रातील उसाच्या दरामध्ये अधिक तफावत असल्याने शेतकरी महाराष्ट्रात जास्त ऊस पाठवत आहेत. यामुळे स्थानिक कारखान्यांना उसाची टंचाई भासण्याची शक्यता आहे.












