सातारा / पुणे : शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी ऑगस्ट क्रांतिदिनी शनिवारी (ता. ९) पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील भिगवण येथे ऊस दूध परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत शेतीमालावरील निर्यातबंदी कायमस्वरूपी उठवावी, संपूर्ण कर्ज, वीजबिल माफी द्यावी, उसाला पहिला हप्ता पाच हजार रुपये प्रतिटन द्यावा, साखर व इथेनॉल कारखान्यासाठीची २५ किलोमीटर हवाई अंतराची अट काढावी, वन्यप्राणी संरक्षण कायदा, गोवंश हत्या बंदी कायदा रद्द करावा, गाईच्या व म्हशीच्या दुधाला प्रति लिटर दर पेट्रोल, डिझेलएवढा मिळावा या मागण्यासांठी ही परिषद होईल. परिषदेत शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा होणार आहे, अशी माहिती शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
रघुनाथ पाटील म्हणाले, परिषदेला डॉ. चंद्रकांत कोलते यांची या वेळी प्रमुख उपस्थिती असेल. पश्चिम महाराष्ट्रात ऊस पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मात्र त्याचा उत्पादन खर्च व मिळणारा दर याचा मेळ बसत नाही. यापूर्वी शेतकरी संघटनांनी ऊसदराच्या प्रश्नावर साखर कारखानदारांविरोधात आंदोलन केले. मात्र कारखानदारांनी शेतकरी संघटनांत फूट पाडून एफआरपीचे राजकारण केले. राजू शेट्टी आमदार, खासदार होण्यापूर्वी एफआरपी दुपटीने वाढत होती. त्यानंतर मात्र संघटनेच्या फुटीचा फायदा कारखानदारांनी घेतला. त्यामुळेच उत्पादन खर्च वाढवूनही तुलनेने फार पैसे मिळत नाहीत. यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल घराळ, विवेक कुराडे, पदाधिकारी उपस्थित होते.